|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ट्रक पळवून साडय़ा, कपडय़ाचे डाग लांबविले

ट्रक पळवून साडय़ा, कपडय़ाचे डाग लांबविले 

संकेश्वर नमाजमाळ येथील घटना : चालक ट्रक पार्किंग करून गेला असता चोरटय़ांचे कृत्य

प्रतिनिधी/ संकेश्वर

कपडे भरून थांबलेला ट्रक अज्ञात चोरटय़ांनी पळवून नेऊन त्यातील कपडय़ांचे डाग लांबविले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री येथील नमाजमाळ भागात घडली आहे. चोरटय़ांनी सदर ट्रक सोलापूर गावाकडे जाणाऱया रस्त्याच्या कडेला थांबविल्याचे उघडकीस आले आहे.

घटनेबाबत समजलेली माहिती अशी, ट्रक (क्र. केए 22 डी 9594)  चालकाने गुरुवारी दुपारी संकेश्वर येथील नमाजमाळ भागात ट्रक थांबवून नमाज पडण्यासाठी तो आपल्या बेल्लद बागेवाडी या गावी गेला होता. शुक्रवारी सकाळी पुन्हा तो ट्रक थांबवलेल्या ठिकाणी पोहोचताच तेथे ट्रक नव्हता. यावरून ट्रक चोरीला गेला का? असा संशय त्याला आल्याने या प्रकाराची माहिती त्याने संकेश्वर पोलिसात दिली.

दरम्यान पोलीस या ट्रकचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असतानाच पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गानजीक सोलापूर गावाकडे जाणाऱया रस्त्याकडेला हा ट्रक थांबला होता व ट्रकची ताडपत्री खुली करून ट्रकमधील कपडय़ाचे डाग लांबविल्याचे निदर्शनास आले आहे. हा ट्रक सुरतहून साडय़ा व कपडे भरून बेंगळूरकडे निघाला होता. या ट्रकमध्ये 160 कपडय़ांचे डाग होते. सध्या या ट्रकमध्ये सुमारे 100 भर डाग असून उर्वरित 60 डाग लांबविले असल्याची चर्चा घटनास्थळी चालली होती. या डागांची किंमत लाखो रुपये इतकी होते. संकेश्वर पोलीस चोरटय़ांचा शोध घेत आहेत.