|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गातील जनता आमच्या सोबतच!

सिंधुदुर्गातील जनता आमच्या सोबतच! 

स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांचा विश्वास

प्रतिनिधी / मालवण:

नवीन पक्ष आणि निवडणुकीच्या कार्यक्रमात मिळालेली निशाणी अशी परिस्थिती असतानाही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गातील मतदारांनी भरभरून मतदान केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेले मतदान आणि आता मिळालेले मतदान पाहता सिंधुदुर्गातील जनता ही नारायण राणेंच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानातून मतदारांनी स्वाभिमानला पसंती दिली असून याच आशीर्वादातून आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातून स्वाभिमानचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

तालुका स्वाभिमान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. यावेळी त्यांनी मालवण तालुक्यातून स्वाभिमानला मिळालेल्या मताधिक्याबद्दल सर्व कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच आगामी कुडाळ-मालवण मतदारसंघातून स्वाभिमानचाच आमदार विजयी होईल, असाही दावा केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, तालुकाध्यक्ष मंदार केणी, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, नगरसेवक यतीन खोत, राजू बिडये, अभय कदम, मंदार लुडबे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

स्वाभिमानविरोधात सगळे पक्ष

लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या विरोधात सगळे राजकीय पक्ष आपापल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन लढले. शिवसेना-भाजप महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्याशी स्वाभिमानने थेट लढत दिली. मागीलवेळी काँग्रेसची निशाणी आमच्यासोबत होती. मात्र यावेळी नवीन निशाणी असतानाही कार्यकर्त्यांनी स्वत: उमेदवार आहोत, असे समजून काम करीत तब्बल दोन लाख 79 हजार मते पक्षाला मिळविली आहेत. त्यामुळे इतर पक्षांची मते वेगवेगळी झाल्यास स्वाभिमानचा विजय निश्चित आहे. या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे, असेही सामंत म्हणाले.

तीनही आमदार स्वाभिमानचे

मागील लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून तब्बल 45 हजारांचे मताधिक्य शिवसेनेला मिळाले होते. मात्र ते आता फक्त काही हजारांवर आले आहे. कणकवली मतदारसंघ स्वाभिमानच्या पाठिशी राहिलेला आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील मालवण तालुका स्वाभिमानच्या पाठिशी असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत तीनही मतदारसंघात स्वाभिमानचेच आमदार विजयी होणार असल्याचा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

यतीन खोत यांचे अभिनंदन

मालवण नगरपालिकेवर शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. नगराध्यक्ष म्हणून महेश कांदळगावकर हे विजयी झाले आहेत. नगराध्यक्षांचे घर ज्या मतदारसंघात येते, त्या मतदान केंद्रावर स्वाभिमानचे नगरसेवक यतीन खोत यांनी पक्षाला लीड मिळवून दिले आहे. त्यामुळे नगराध्यक्षांची ताकद लोकसभा निवडणुकीनिमित्ताने शिवसेना आणि शहरवासीयांनी समजून चुकलेली आहे. मालवण शहरातील सर्वच नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे स्वाभिमान एक नंबरवर राहिलेली आहे. यामुळे ज्यांच्यासोबत जनमन नाही, त्यांनी सत्ताधारी म्हणवून घेणे म्हणजे चुकीचे ठरणार आहे, असा टोला सामंत यांनी लगावला.