|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मोदींवरच ‘रालोआ’चा विश्वास

मोदींवरच ‘रालोआ’चा विश्वास 

नेतेपदी निवड : प्रस्ताव एकमताने मंजूर : राष्ट्रपतींची भेट घेत केला सत्तास्थापनेचा दावा : 30 मे रोजी शपथविधीचा सोहळा पार पडणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी शनिवारी एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) 353 खासदारांनी मोदींवर विश्वास दाखवत पूर्ण पाठिंबा दिला आहे. दिल्लीत पार पडलेल्या रालोआच्या बैठकीत नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर मोदींनीही रालोआचा प्रयोग आणखी यशस्वी करायचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान, शनिवारी रात्रीत मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला असून 30 मे रोजी शपथविधी होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा केंद्रात सत्ता काबीज केल्यानंतर शनिवारी दिल्लीत रालोआच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. रालोआच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड करण्याच्या निर्णय घेण्यात आला. रालोआचे 353 खासदार निवडून आले असून यातून जनतेचा मोदींवरील विश्वास दिसून येतो. प्रचारादरम्यान अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले, पण आम्हाला आणि आमच्या मित्रपक्षांना विश्वास होता की आम्ही 50 टक्के जागांवर यशस्वी होऊ. देशाच्या मतदारांनी मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी मोदींवरच विश्वास असल्याचे जाहीर केले.

संसदीय नेतेपदी निवड होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ये÷ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे आशीर्वाद घेतले. लोकसभा मतदारसंघनिहाय अधिकृत निकाल शुक्रवारी जाहीर झाले. यानंतर शनिवारी भाजप आणि घटक पक्षांचे खासदार दिल्लीत पोहोचले. भाजपच्या संसदीय दलाची शनिवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीत रालोआतील घटक पक्षांचेही खासदार आणि महत्त्वाच्या पक्षांचे नेते उपस्थित होते.

मोदींनी मानले देशवासियांचे आभार

रालोआच्या प्रमुखपदी निवड झाल्यानंतर रालोआच्या खासदारांशी मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले. या देशातील जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच आज रालोआला हे मोठे यश मिळालेले आहे. या विश्वासाचे सार्थक करताना विश्वास दाखवणाऱयांबरोबरच विश्वास न दाखवणाऱयांवरही तेवढय़ाच जीवाभावाने प्रेम करणार असल्याचे मोदी म्हणाले. जनता जनार्दन ईश्वराचे रूप असते असे सांगत विश्वास दाखवणाऱयांबरोबरच ज्यांचा विश्वास मिळवायचाय अशा दोघांसाठी काम करणार असल्याचे मोदी म्हणाले. यंदाच्या निवडणुकीत महिलांनी मोठय़ा प्रमाणावर मतदान केले असून नारीशक्तीचे त्यांनी आभार मानले.

नरेंद्र मोदींनी 2014 मध्ये केलेले सगळे विक्रम नरेंद्र मोदींनीच 2019 मध्ये तोडले असे त्यांनी सांगितले. अमेरिकेच्या अध्यक्षाला जेवढी मते मिळाली तेवढी तर आपल्या मतांमध्ये 2019 मध्ये वाढ झाली असे सांगत नरेंद्र मोदींनी भारताच्या विशालतेचे वर्णन केले. तसेच सभागृहातील वाजपेयींचे छायाचित्र आपल्याला आशीर्वाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रसिद्धीच्या मोहापासून सावध राहण्याचा सल्ला मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना दिला.

आम्ही मतांबरोबरच मनेही जिंकली : अमित शाह

संसदीत दलाच्या बैठकीत बोलताना भाजपच्या संसदीय मोदी त्सुनामीने विरोधकांना उद्ध्वस्त केले, असे अमित शाह यांनी सांगितले. जनतेच्या मनात राग होता की दहशतवादाविरोधात कारवाई केली जात नाही. पण मोदी सरकारने दहशतवाद्यांवर त्यांच्या घरात घुसून कारवाई करताच आम्ही देशवासियांची मने जिंकली, असे शाह म्हणाले. 1960 च्या दशकात लोकशाहीला घराणेशाही, जातीवाद आणि लांगुलचालन या तीन गोष्टींनी ग्रासले होते. प्रत्येक वेळी हीच परिस्थिती दिसून यायची. पण 2019 मधील जनादेशाने घराणेशाही, जातीवाद आणि लांगुलचालनाला राजकारणातून बाहेर फेकले, असेही शाह म्हणाले.