|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संकेश्वरात अज्ञातांनी रिक्षा पेटविली

संकेश्वरात अज्ञातांनी रिक्षा पेटविली 

रोख रकमेसह दीड लाखाचे नुकसान : संकेश्वर पोलिसात नोंद

प्रतिनिधी/  संकेश्वर

अज्ञातांनी घरासमोरील रिक्षा पेटवून खाक केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री संकेश्वर येथील भीमनगरात घडली. या रिक्षात दोन हजाराची रक्कम व गाडीची कागदपत्रे होती. रिक्षासह सर्वच आगीत भस्मसात होऊन दीड लाखाचे नुकसान झाल्याची माहिती रिक्षाचे मालक शशिकांत शिवपूत्र मेळगिरी यांनी दिली. दरम्यान दोन वर्षापूर्वीही मेळगिरी यांच्या मोटारसायकलचे पुढचे टायर जाळण्यात आले होते.  याबाबत मेळगिरी यांनी संकेश्वर पोलिसात अज्ञातांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

या घटनेसंदर्भात समजलेली माहिती अशी की, रिक्षा मालक शशिकांत यांनी रात्री 11 च्या सुमारास नेहमीप्रमाणे घरासमोर रिक्षा थांबवली होती. मध्यरात्री अचानक टायर बस्ट झाल्याचा मोठा आवाज येताच त्यांनी दार उघडल्यानंतर रिक्षाला आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी आरडा-ओरडा करताच शेजाऱयांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा आग विझवण्यात आली. मात्र आगीत रिक्षा बेचिराख झाली आहे.

दोन वर्षापूर्वी मोटारसायकलला आग

दोन वर्षापूर्वी मेळगिरी यांनी मोटारसायकल आणली होती. मोटारसायकल अशीच बाहेर लावली होती. तेंव्हाही रात्री मोटारसायकलचे पुढचे टायर जाळण्यात आले होते. तसेच काही महिन्यापूर्वी रात्रीच्यावेळी काहींनी रिक्षावर रॉकेल ओतले होते. यावरुन रिक्षा पेटवण्याचे कामही त्यांनीच केले असल्याची तक्रार मेळगिरी यांनी संकेश्वर पोलिसात दिली आहे. रात्री उशिरा या घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे.