|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » किल्ला तलाव आवारात प्रवेशासाठी शुल्क आकारणी

किल्ला तलाव आवारात प्रवेशासाठी शुल्क आकारणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

किल्ला तलाव आवारात प्रवेशासाठी आता ठराविक रक्कम मोजावी लागत आहे. आत जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाधिकाऱयांनी हा आदेश बजावला आहे. मात्र, या आदेशामुळे किल्ला तलाव आवारात पहाटे व सायंकाळी वायुविहारासाठी येणाऱया नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. यामुळे प्रवेश शुल्काचा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

या किल्ला तलाव आवारात दररोज पहाटे आणि सायंकाळच्या दरम्यान वायुविहासाठी येणाऱयांची संख्या मोठी आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि वयोवृद्धांचा मोठा सहभाग आहे. मात्र, आता प्रवेशासाठी शुल्क आकारण्यात येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांवर वायुविहारासाठी अन्यत्र जाण्याची वेळ आली आहे. वायुविहासाठी येणाऱया नागरिकांसाठी मासिक पासची व्यवस्था करण्यात आली आहे. महिन्यास 150 रुपये भरून पावती घ्यावी लागणार आहे. किंवा दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत किल्ला आवारात प्रवेश घ्यावयाचा असल्यास पालकांना 10 रुपये आणि बालकांसाठी 5 रुपये दर निर्धारित करण्यात आला आहे. सदर प्रवेश शुल्काबाबत तसेच दराबाबत किल्ला तलावाच्या प्रवेशद्वारावर मोठा फलक लावण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱयांनी बजावलेल्या या आदेशामुळे बेळगाववासियांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

किल्ला तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी प्रशासनाकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. यामुळे आवारात कचऱयाचे ढीग निर्माण होऊन दुर्गंधी पसरली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक नसल्याने अनेक गैरप्रकारही घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने प्रवेश शुल्काचा निर्णय घेतला आहे. मात्र, यामुळे गैरप्रकार पूर्णपणे थांबणार आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गैरप्रकार थांबविण्यासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.