|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पदवीधर शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा

पदवीधर शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा 

प्रतिनिधी/ बेळगाव

पदवीधर शिक्षक भरती प्रक्रियेसाठीच्या सीईटी परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला. इयत्ता सहावी ते आठवी या उच्च प्राथमिक शाळांच्या शिक्षक भरतीसाठी सदर परीक्षा घेण्यात येत आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातून एकूण 1630 परीक्षार्थी पदवीधर शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा देत आहेत. जिह्यात एकूण 249 जागांसाठी सदर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामुळे भरतीसाठीच्या सीईटी परीक्षेत मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येत आहे. उच्च प्राथमिक शाळांमधील रिक्त जागांवरील भरती प्रक्रियेसाठी सदर परीक्षा घेण्यात येत असून यामुळे सहावी ते आठवीच्या वर्गांना शिक्षक मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

शनिवार आणि रविवार अशा दोन दिवसात सदर सीईटी परीक्षा पार पडणार आहे. शनिवारी दोन सत्रात सदर परीक्षा पार पडली. सकाळच्या सत्रात जनरल विषयाचा पहिला पेपर पार पडला. तर दुपारच्या सत्रात 2.30 वाजता भाषा विषयाचा पेपर झाला. जिल्हय़ात एकूण 7 केंद्रांवर सदर परीक्षा घेण्यात आली. यामध्ये वनिता विद्यालय, बेनन स्मिथ हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, सेंट पॉल्स, सेंट जोसेफ हायस्कूल, अंजुमन इंग्रजी माध्यम स्कूल, मराठा मंडळ हायस्कूल  या केंद्रांवर पदवीधर शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेण्यात येत आहे.

1630 परीक्षार्थीपैकी पहिल्या पेपरला एकूण 1088 विद्यार्थी हजर होते. तर गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या 542 इतकी होती. यामुळे पहिल्या पेपरला 66.24 टक्के उपस्थिती असल्याचे दिसून आले. तर  दुसऱया सत्रात इंग्रजी विषयाचा पेपर पाडला. 301 परीक्षार्थींपैकी पेपरला 173 विद्यार्थी उपस्थित होते. सदर पेपरला 128 जणांनी दांडी मारली. पदवीधर शिक्षक भरतीसाठीचे दोन्ही पेपर सुरळीतपणे पार पडले असून रविवारी विज्ञान, गणित, व समाजविज्ञान, भाषा कौशल्य या विषयांचे पेपर होणार असून यानंतर रविवारी परीक्षेची समाप्ती होणार आहे.