|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » गंमतीशीर ‘भुतियापंती’च्या चित्रीकरणाला प्रारंभ

गंमतीशीर ‘भुतियापंती’च्या चित्रीकरणाला प्रारंभ 

विनोदी चित्रपटांची लाट कधीच ओसरत नसली तरी थरारक पण काहीसे गंमतीशीर चित्रपटही वरचेवर बनत असतात, जे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होतात. प्रेक्षकही अशा चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. अशाच चित्रपटांच्या पंक्तीत विराजमान होणारा ‘भुतियापंती’ हा आगामी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या सेवेत रूजू होण्यासाठी सज्ज होत आहे. गंमतीशीर, पण थरारक वाटावे असे शीर्षक असलेल्या ‘भुतियापंती’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या घोषणेनंतर मोठय़ा थाटात ‘भुतियापंती’चा मुहूर्त करण्यात आला.

थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि विनोद बरदाडे प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते विनोद बरदाडे आणि सहनिर्माते नरेश चव्हाण ‘भुतियापंती’ची निर्मिती करत आहेत. सध्या भोरमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण वेगात सुरू आहे. दिग्दर्शक संचित यादव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱया या चित्रपटाचे टायटल पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. यापूर्वा ‘बे एके बे’ या चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन करणाऱया संचित यादव यांचा ‘भुतियापंती’ हा दिग्दर्शक म्हणून दुसरा चित्रपट आहे.

‘भुतियापंती’ची कथा, पटकथा, संवाद आणि गीतलेखन विनय येरापले यांनी केले आहे. दिग्दर्शनाकडे वळण्यापूर्वा अभिनयात आपला ठसा उमटवणारे संचित यादव या चित्रपटातही एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. त्यांच्या जोडीला यात अरुण नलावडे, कमलेश सावंत, पूर्णिमा वाव्हळ-यादव, अमित चव्हाण, तफशांत पाते, सुदेश म्हशीलकर, प्रभाकर मोरे, अंकुर वाडवे, आभा वेलणकर, संदीप जुवाटकर, मानसी संकपाळ, अमित शिंदे, समीर काळंबे, सचिन खंडागळे आदी कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत