|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधान मोदींना भेटले जगनमोहन

पंतप्रधान मोदींना भेटले जगनमोहन 

मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे दिले आमंत्रण : आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसला बहुमत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

 आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमतासह लवकरच सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेले वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ही भेट अत्यंत सौहार्दपूर्ण राहिली असून मोदींनी जगनमोहन यांची गळाभेट घेत त्यांचे स्वागत केले आहे. वायएसआर काँग्रेस प्रमुखांनी पंतप्रधानांना शाल आणि तिरुपती बालाजीचे चित्र भेटीदाखल दिले आहे.

जगनमोहन यांनी मोदींना शपथविधीत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे. जगनमोहन हे 30 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मोदींची भेट घेतल्यावर जगन यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली आहे.

राज्याचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचे पुत्र असलेल्या जगनमोहन यांच्या पक्षाला आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत 175 पैकी 151 मतदारसंघांमध्ये विजय मिळाला आहे. त्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला मोठय़ा फरकाने पराभूत केले आहे. तेलगू देसम पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे.  2009 मध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत राज्याचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेल्या वाय.एस.आर. राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू झाला होता. वडिलांच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेतृत्वासोबत झालेल्या मतभेदांपोटी जगनमोहन यांनी 2011 मध्ये नवा पक्ष स्थापन केला होता.