|Saturday, October 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » त्रिपुरात पावसामुळे पूर

त्रिपुरात पावसामुळे पूर 

1 हजाराहून अधिक घरांचे झाले नुकसान

वृत्तसंस्था/  अगरतळा 

मुसळधार पावसामुळे त्रिपुराच्या मानु, जुरी, काकती नदीची जलपातळी वाढल्याने पूरसंकट निर्माण झाले आहे. पुरामुळे उत्तर त्रिपुरासह उनाकोटि आणि धलाई जिल्हय़ात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शासकीय आकडेवारीनुसार पुरामुळे 1039 घरे वाहून गेली आहेत.

पुरामुळे त्रिपुराच्या 8 जिल्हय़ांमधील स्थिती गंभीर झाली असली तरीही अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह त्रिपुरा स्टेट रायफल आणि राज्य, जिल्हा प्रशासनाची पथके बचावकार्यात सहभागी झाली आहेत. एनडीआरएफनुसार मानु, जुरी आणि काकती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धलाई जिल्हय़ात पुरामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती राज्य आपत्ती निवारण केंद्राने दिली आहे. उनाकोटिमध्ये 358 घरांचे नुकसान झाले असून उत्तर त्रिपुरात हा आकडा 381 इतका आहे.