|Sunday, August 18, 2019
You are here: Home » Top News » निकालानंतर लालूंनी खाणं सोडलं

निकालानंतर लालूंनी खाणं सोडलं 

राजद अध्यक्षांची प्रकृती बिघडली

  वृत्तसंस्था/  रांची 

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी खाणंपिणं सोडलं आहे. रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल लालू यादव यांच्या डॉक्टर्सनी याबद्दल माहिती देत खाणं सोडल्याने त्यांची प्रकृती बिघडत चालल्याचे सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीत राजदला भोपळा फोडता आला नव्हता.

 मागील 2-3 दिवसांपासून लालू सकाळी नाश्ता करत असले तरीही दुपारच्या वेळेस जेवत नाहीत, थेट रात्री खात असल्याने त्यांना इन्सुलिन देण्यास अडचण होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. बिहारच्या 40 पैकी 39 जागा रालोआने पटकाविल्या आहेत.

रक्तदाबावर प्रभाव शक्य

लालूंची समजूत काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशाप्रकारे आहार सोडून देणं त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. वेळेत आहार न केल्यास त्यांना औषधै आणि इन्सुलिन देणे अवघड ठरेल आणि त्यांच्या प्रकृतीवर वाईट प्रभाव पडू शकतो. त्यांच्या दिनचर्येत सुधारणा न झाल्यास रक्तदाब आणि रक्तशर्करेच्या पातळीवर प्रभाव पडू शकत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. लालू यादव चारा घोटाळय़ाप्रकरणी तुरुंगात कैद असून रांचीच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तर राजदच्या एका आमदाराने हे वृत्त फेटाळले आहे. लालू यादवांसाठी ही पहिली निवडणूक नव्हते. लालूंनी विधानसभा निवडणुकीत भाजपसमोर मोठे आव्हान उभे करण्याचा निर्देश दिल्याचा दावा आमदाराने केला आहे. राजद, काँग्रेस, हम आणि रालोसप या सर्वांनी आघाडी करत निवडणूक लढविली होती. यातील काँग्रेसला बिहारमध्ये एका जागेवर यश मिळू शकले आहे.