|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शपथ सोहळय़ाची दिल्लीत लगबग

शपथ सोहळय़ाची दिल्लीत लगबग 

30 रोजी सायंकाळी 7 वाजता शपथग्रहण : मोदी मंत्रिमंडळातील मोहऱयांची चाचपणी सुरू

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आता देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून शपथविधी सोहळय़ासाठीही 30 मे रोजीची तारीख आणि सायंकाळी 7 वाजण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. या सोहळय़ाची जय्यत तयारी राष्ट्रपती भवनात सुरू झाली आहे. तसेच विविध पाहुण्यांसाठी या सोहळय़ाला आमंत्रित करण्यासही प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आता नव्या मंत्रिमंडळाची उत्सुकता लागली असून कोणत्या नवीन मोहऱयांना मोदी टीममध्ये संधी मिळते हे पहावे लागणार आहे.

नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींसमवेत झालेल्या चर्चेअंती शपथविधी सोहळय़ाचा मुहूर्त निश्चित झाला. त्यानुसार नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात सायंकाळी सात वाजता शपथविधी कार्यक्रम होणार आहे. या सोहळय़ात राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच काही निवडक मंत्र्यांनाही शपथ देतील. हे शपथविधी सोहळय़ासाठी 3 हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे. त्यामध्ये विविध पक्षांचे नेते, ज्येष्ठ नेतेमंडळी, विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, महनीय व्यक्ती आणि पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.

मंत्र्यांच्या निवडीबाबतही चर्चेच्या फेऱया सुरू

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर पुढील काही दिवसात मंत्रिमंडळाची स्थापना होईल. त्यानुसार नवे मंत्रिमंडळ निश्चित करण्यासंबंधीची चर्चाही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सुरू झाली आहे. पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांबरोबरच रालोआमधील घटक पक्षांनाही मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले जाणार आहे. त्यामुळे विविध प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांशी भाजपचे वरिष्ठ नेते चर्चा करू लागले आहेत. त्या अनुषंगाने नव्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱयांना संधी मिळते हे पाहणे औत्सुक्मयाचे ठरणार आहे.

इम्रान खान यांचा मोदींना फोन

नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे देशात पुन्हा मोदींचेच सरकार स्थापन होताच त्यांच्यावर विदेशातूनही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अमेरिकेसह अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांकडून मोदींना शुभेच्छा संदेश येत असतानाच रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी   त्यांनी लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. यावेळी झालेल्या चर्चेत दोन्ही देशात शांतता आणि समृद्धीसाठी हिंसामुक्त, दहशतवादमुक्त वातावरणाची खूप आवश्यकता आहे’ असाही विषय निघाला. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली.

स्वगृही जल्लोषी स्वागत

लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या अभुतपूर्व विजयानंतर प्रथमच गुजरात दौऱयावर दाखल झालेल्या नरेंद्र मोदी यांचे राज्यात जल्लोषी स्वागत करण्यात आले. अहमदाबाद विमानतळावर मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मोदी अहमदाबादमधील सरदार वल्लबभाई पटेल यांच्या भव्य पुतळय़ासमोर नतमस्तक झाले. तत्पूर्वी विमानतळ ते इंद्रा ब्रिजपर्यंत मिनी रोडशोही झाला. पटेल यांच्या पुतळय़ाला अभिवादन केल्यानंतर त्यांनी अहमदाबाद येथे एका सभेमध्ये राज्यवासियांना संबोधित केले. व्यासपीठावर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले. सभेमध्ये बोलताना मोदींनी गुजरातप्रमाणेच आता देशातील प्रत्येक घरा-घरात भाजपचा आवाज पोहोचवणार असल्याची घोषणा केली. गुजरात दौऱयादरम्यान मोदी यांनी आपल्या मातोश्री हिराबा मोदी यांचीही भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.