|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » अँजेलिक केर्बरला पहिल्याच फेरीत धक्का

अँजेलिक केर्बरला पहिल्याच फेरीत धक्का 

पोटापोव्हाकडून पराभूत, सित्सिपस, डिमिट्रोव्ह, मुगुरुझा, सिलिक, निशिकोरी दुसऱया फेरीत, कुझनेत्सोव्हा स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था/ पॅरिस

ग्रीसचा उदयोन्मुख टेनिसपटू स्टीफानोज सित्सिपसने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला असून महिला एकेरीत पहिल्याच दिवशी धक्कादायक निकाल देताना रशियाच्या 18 वर्षीय ऍनास्तेशिया पोटोपोव्हाने जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचे आव्हान संपुष्टात आणले. जपानचा निशिकोरी, क्रोएशियाचा सिलिक, डिमिट्रोव्ह, गार्बिन मुगुरुझा यांनीही दुसरी फेरी गाठली आहे तर रशियाची कुझनेत्सोव्हा पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडली आहे.

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील लढतीत 20 वर्षीय सहाव्या मानांकित सित्सिपसने जर्मनीच्या मॅक्सिमिलियन मार्टेरररवर 6-2, 6-2, 7-6 (7-4) अशी मात केली. त्याची पुढील लढत बोलिव्हियाचा हय़ुगो डेलियनशी होईल. डेलियनने भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनला 6-1, 6-3, 6-1 असे पराभूत केले.  अन्य एका सामन्यात ग्रिगोर डिमिट्रोव्हने यांको टिपसरेव्हिकचा 6-3, 6-0, 3-6, 6-7 (4-7), 6-4 अशी संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून दुसऱया फेरीत स्थान मिळविले. अकराव्या मानांकित क्रोएशियाच्या मारिन सिलिकनेही दुसरी फेरी गाठताना थॉमस फॅबियानोचा 6-3, 7-5, 6-1 असा पराभव केला तर मॅटेव बेरेटिनीने पाब्लो अँडय़ुअरवर 6-7 (3-7), 6-4, 6-4, 6-2 अशी मात केली. कॅस्पर रुडने अर्नेस्ट्स गुल्बिसला 6-2, 7-6 (7-2), 6-0 असे नमविले तर सातव्या मानांकित जपानच्या केई निशिकोरीने क्वेन्टिन हॅलीसचा 6-2, 6-3, 6-4 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

केर्बरला धक्का

महिला एकेरीत रशियाच्या 18 वर्षीय पोटोपोव्हाने जर्मनीच्या पाचव्या मानांकित अँजेलिक केर्बरला पराभवाचा धक्का दिला. जागतिक क्रमवारीत 81 व्या स्थानावर असणाऱया पोटापोव्हाने निर्भीड खेळ करीत केर्बरवर 6-4, 6-2 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. प्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्यांदाच खेळताना तिने धक्कादायक निकाल दिला आहे. अव्वल दहामधील खेळाडूंशी खेळण्याची तिची ही दुसरी वेळ होती. करिअर ग्रँडस्लॅम मिळविण्याच्या इराद्याने उतरलेल्या केर्बरचा मात्र स्वप्नभंग झाला आहे. पोटापोव्हाच्या आक्रमक खेळाचे तिला प्रत्युत्तर देता आले नाही. या सामन्यात पोटापोव्हाने प्रारंभापासूनच वर्चस्व मिळविले होते. पहिल्या सेटमध्ये केर्बरकडून प्रतिकार झाला. पण आत्मविश्वास वाढल्यानंतर पोटापोव्हाने दुसरा सेट आरामात जिंकून आगेकूच केली. तिची पुढील लढत मर्केटा व्होन्डरूसोव्हाशी होईल. मर्केटाने चीनच्या वांग याफानचा 6-4, 6-3 असा पराभव केला.

मुगुरुझा दुसऱया फेरीत

19 व्या मानांकित गार्बिन मुगुरुझाने दुसरी फेरी गाठताना टेलर टाऊनसेन्डवर 5-7, 6-2, 6-2 अशी मात केली. याशिवाय जोहाना लार्सनने मॅग्डालेना रीबरिकोव्हाचा 6-3, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली आहे. रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हाचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. तिला पात्रता फेरीतून आलेल्या क्रिस्टिना कुकोव्हाने 6-4, 6-2 असे नमविले. 31 व्या मानांकित पेत्र मार्टिकने ओन्स जेबॉवर 6-1, 6-2 असा सहज विजय मिळवित दुसऱया फेरीत स्थान मिळविले.