|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » खरीप पेरणी साधण्यासाठी शेतकऱयांची लगबग

खरीप पेरणी साधण्यासाठी शेतकऱयांची लगबग 

वार्ताहर/ शिरगाव

खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकरी पेरणी पूर्व मशागतीच्या कामात गुंतल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या  वळीव पावसामुळे जमिनीची मशागत नांगरट कुळवणी करणे सुलभ झाले आहे.   

भुईमुग उन्हाळी भात सोयाबीन सूर्यफुल पिकांची सध्या काढणी सुरु असून  सध्या शिवारात पेरणीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मे महिनाअखेर पावसाचे रोहिणी नक्षत्र सुरु होते. त्यामुळे या नक्षत्रावर पेरा साधण्यासाठी शेतकरी मग्नगन आहेत. बियाणे व रासायानिक खतांचा अपेक्षित साठा व पुरवठा होत असला तरी बीबियाणे पडताळून घेण्यासाठी कृषीअधिकारी मार्गदर्शन करत आहेत. अंदाजाप्रमाणे पाऊस वेळेवर सुरु होईल हे गृहित धरून धूळवाफ पेरणीसाठी बळीराजाची लगबग सुरु आहे. खरीपाच्या या तयारीमध्ये शेतकऱयांचे सर्व कुटुंब व्यस्त असून शिवार फुलल्याचे चित्र तालुक्यात आहे.

जिह्याच्या पश्चिम भागामध्ये धुळवाफ पेरणी सुरु होत आहे. तर राधानगरी तालुक्यात पूर्व भागात धूळवाफ पेरणी केली जाते. पश्चिम भागात रोपलागण ऐन पावसाळ्यात करतात. ऊसपिकाची भरणी करून पाणी दिले जात आहे. एक दोन दिवसात पेरणीला सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी पेरणी केलेल्या पिकांना सिंचन योजनेद्वारे पाणी देवून त्याची उगवण केली जाते. जिह्याचे भौगोलिक क्षेत्र 7.76 लाख हेक्टर असून 4.77 लाख हेक्टर क्षेत्र पेरणीलायक आहे. खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र 3.94 लाख हेक्टर आहे. यामध्ये भात, ज्वारी, नागली, सोयाबिन, भुईमुग, इतर कडधान्ये व भाजीपाल्यांचा समावेश होतो. शेतकऱयांना दर्जेदार बियाणे, खते व किटकनाशके योग्य दरामध्ये उपलब्ध होण्यासाठी उत्पादक, वितरक व विक्रेते यांच्या उत्पादन व विक्री स्थळांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यासाठी विभागवार पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

पेरणीपूर्व मशागतीसाठी जोरदार वळीव पावसाची आवश्यकता असते. गेल्या काही दिवसांमध्ये बहुतांशी भागात झालेल्या वळीव पावसामुळे खरीपाच्या पूर्वमशातीला वेग आला आहे. दरवर्षी शेतकऱयांकडून रोहिणीचा पेरा साधण्यासाठी प्रयत्न केले जातात. ‘रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तुरा’ या म्हणीप्रमाणे या नक्षत्रावर पेरणी केल्यानंतर पिकाची चांगली उगवण होऊन वाढ होते अशी शेतकऱयाची धारणा आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडेल असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या आशा पल्लवीत झाल्या असून पेरणीसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.