|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आमदार बाबर यांना बळ तर पडळकरांच्या अपेक्षा उंचावल्या

आमदार बाबर यांना बळ तर पडळकरांच्या अपेक्षा उंचावल्या 

सचिन भादुले/ विटा

लोकसभा निवडणूकीत खानापूर विधानसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे गोपिचंद पडळकर यांनी मताधिक्य घेतले आहे. खासदार संजय पाटील यांच्या पारडय़ात भरभरून मतांचे दान टाकताना मतदारसंघात अद्याप आमदार अनिल बाबर यांची सद्दी असल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. माजी आमदार सदाशिव पाटील यांनी निर्णय घेण्यास लावलेला उशीर भोवल्याचे विशाल पाटील यांना मिळालेल्या अल्प मतावरून लक्षात येत आहे. एकुणच खानापूर विधानसभा मतदारसंघात आमदार बाबर यांना बळ देणारा, पडळकर यांच्या अपेक्षा वाढवणारा आणि माजी आमदार पाटील यांना आत्मचिंतन करायला लावणारा हा निकाल आहे, असेच म्हणावे लागेल.

लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार संजय पाटील यांना पुन्हा एकदा कौल देतानाच मतदारांनी मोदी सरकारवर विश्वास दाखवला आहे. खानापूर तालुक्यासह मतदारसंघात खासदार पाटील यांनी गेल्या पाच वर्षात ठेवलेला संपर्क त्यांच्या कामी आला आहे. शिवाय आमदार अनिल बाबर यांनी लोकसभा निवडणूकीच्या अगोदरच भाजपला सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले होते. वास्तविक पाहता आमदार बाबर आणि खासदार पाटील यांच्यात फारसे सख्य नव्हते. खासदार पाटील यांनी आमदार बाबर यांचे राजकीय विरोधक माजी आमदार सदाशिव पाटील गटाला बळ देण्याची भूमिका घेतली होती.

मात्र भाजप सरकारने सहकार्य केल्याचे सांगत आमदार बाबर यांनी वाद बाजूला ठेऊन खासदार पाटील यांच्या प्रचाराची धुरा हाती घेतली. विटा शहरासह तालुक्यातून मताधिक्य देत पाटील यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. वास्तविक आमदार बाबर हे जिल्हय़ाच्या राजकीय पटलावर स्व. वसंतदादा गटाचे मानले जातात. परंतू गेल्या पाच वर्षातील बदललेल्या राजकीय संदर्भाने आमदार बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द पाळला आहे. शिवाय मतदारसंघात अद्यापही आमदार बाबर यांची सद्दी कायम असल्याचे खासदार पाटील यांना मिळालेल्या मतावरून दिसून येत आहे.

दुसरीकडे गोपिचंद पडळकर यांच्या रूपाने खानापूर विधानसभा मतदारसंघातील तरूण नेतृत्त्वाने लोकसभा निवडणूकीत जिल्हय़ातील प्रस्थापित नेत्यांना आव्हान दिले होते. तत्पूर्वी धनगर आरक्षणाच्या निमीत्ताने जिल्हा आणि राज्यात त्यांनी रान तापवले होते. वंचित बहुजन आघाडीतून उमेदवारी करीत त्यांनी निवडणूकीत रंगत आणली होती. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत गोपिचंद पडळकर मतदारसंघात तिसऱया स्थानी होते. मात्र साडेचार वर्षातील संपर्क आणि चळवळीचे फलित म्हणून त्यांना मतदारसंघाने डोक्यावर घेतले. खानापूर विधानसभा मतदारसंघात त्यांनी आघाडी घेत आगामी काळात आपण जायंट किलर ठरू शकतो, हे दाखवून दिले आहे.

खानापूर तालुक्यात देखिल विशाल पाटील यांच्या पाठोपाठ त्यांना मते मिळाली आहेत. विटा शहरातही चांगले मतदान मिळाले आहे. कोणताही मोठा राजकीय नेता पाठीशी नसताना खानापूर तालुक्यात त्यांना मिळालेली मते प्रस्थापित नेत्यांना चिंतन करायला लावणारी आहेत. अर्थातच विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीचे संदर्भ वेगळे असतात. परंतू तरीही आगामी काळात खानापूर विधानसभा मतदारसंघात पडळकर फॅक्टर निर्णायक ठरणार असल्याची चिन्हे आहेत.

या निवडणूकीत माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या गटाने निर्णय घेण्यासाठी खूपच वेळ घेतला. तत्पूर्वीच्या साडेचार वर्षे माजी आमदार पाटील गटाचे कार्यकर्ते खासदार संजय पाटील यांच्या सातत्याने संपर्कात होते. त्याचा फायदा घेत खासदार पाटील यांनी आमदार बाबर गटाशी युती झाल्यानंतरही पाटील गटाच्या शिलेदारांशी सातत्याने संपर्क ठेवला. परिणामी कार्यकर्ते शब्दात अडकले. त्याचा परिणाम म्हणून माजी आमदार पाटील यांनी निर्णय घेतल्यानंतरही काही कार्यकर्त्यांनी खासदार गटाचा झेंडा हाती घेतला होता. त्याचा फायदा खासदार पाटील यांना झाला.

माजी आमदार पाटील यांचा निर्णय होण्यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते वगळता विशाल पाटील यांच्याकडे मतदारसंघात फारशी बेरीज नव्हती. माजी आमदार पाटील यांच्या निर्णयाने विशाल पाटील स्पर्धेत आले. तथापि खानापूर आणि आटपाडी तालुक्यात विशाल पाटील यांना मिळालेली अल्प मते माजी आमदार पाटील गटाला आत्मचिंतन करायला लावणारी आहेत. विशेषतः विटा शहरातील खासदार पाटील यांचे मताधिक्य अधिक चर्चेत आले आहे. अशावेळी माजी आमदार पाटील गटाला आगामी विधानसभेसाठी खूपच तयारी करावी लागणार आहे. आमदार बाबर आणि पडळकर यांनी घेतलेले निर्णायकी मतदान तुलनेने पाटील यांच्यासाठी चिंतनाचा विषय आहे.

एकुणच गतवेळी चौरंगी लढत झालेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात मतविभाजनाचा फायदा आमदार अनिल बाबर यांना मिळाला होता. यावेळी गोपिचंद पडळकर यांनी मतदारसंघात निर्णायकी मतदान घेत आपण पुन्हा स्पर्धेत राहू शकतो, हे दाखवून दिले आहे. आमदार बाबर यांनी खासदार पाटील यांच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना मतांचे दान भरभरून दिल्याने विसापूर सर्कलमध्ये खासदार गटाची रसद मिळण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय दांडगा लोकसंपर्क ही जमेची बाजू असल्याने आमदार बाबर यांना पुन्हा चांगली संधी आहे. तर दुसरीकडे माजी आमदार पाटील गटाला स्पर्धेत येण्यासाठी मात्र खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणूकीच्या निकालावरून तरी मतदारसंघाचे चित्र असेच दिसत आहे.