|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हद्दवाढ भागात आठ दिवसाआड येतोय टँकर

हद्दवाढ भागात आठ दिवसाआड येतोय टँकर 

रणजित वाघमारे/ सोलापूर

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱया औज येथील बंधाऱयातील पाणी जवळ जवळ संपत आले असून, महापालिकेचे पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक कोलमडले असल्यामुळे शहरातील विशेषतः हद्दवाढ भागात टँकर देखील आठ दिवसाआड येत असल्यामुळे लोकांचे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत. नळाला पाणी नाही, टँकर नाही. अशा परिस्थीतीत लोकांना विकत पाणी घेवून गरज भागवावी लागत आहे.

    सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येणाऱया औज बंधाऱयाने तळ गाठला असून उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. परंतु सध्या उजनी धरणात उणे पन्नास टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यात आणखी अडचणी येत आहेत. परिणामी सोलापूर महानगरपालिकेकडून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात शहरात पाच ते सहा आणि हद्दवाढ भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. तर विडी घरकुल व इतर भागात महानगरपालिकेची पिण्याची पाईपलाईन नाही. त्यामुळे या भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु टँकर देखील दहा-दहा दिवसानंतर येत असल्याने नागरीकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत. लग्नसमारंभाच्या दिवशीदेखील पाण्याचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी कुटूंबातील महिलांना लग्नसमारंभास जाता येत नाही. त्यामुळे या विस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

  सोलापूर शहरातील जुळे सोलापूर, सैफूल, पूर्व विभाग, विनायक नगर, शेळगी आदी हद्दवाढ भागात सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तर अनेक वेळा दुषीत व गढूळ पाणीपुरवठा झाल्याने नागरीकांचे आणखी हाल होत आहे. सहा ते आठ दिवसाआड होणाऱया पाणीपुरवठय़ामुळे नागरीकांकडून घरातील स्वयंपाकाची भांडी, घागरी, बादल्या, बॅरल, हौद यामध्ये पाणी साठवणूक केली जात आहे.