|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » घरात घुसून युवकाचा खून

घरात घुसून युवकाचा खून 

प्रतिनिधी/ सांगली

येथील संजयनगर परिसरातील साईनगर येथे मित्राच्या घरी जेवण करण्यासाठी गेलेल्या युवकाचा चाकूने वार करुन खून करण्यात आला. पाडुरंग तुकाराम गलांडे (वय 39 रा. रामरहिम कॉलनी, संजयनगर, सांगली) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत गणेश मारुती कांबळे (वय 39 रा. साईनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका हल्लेखोरास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

विश्वजित उर्फ गबऱया नामदेव माने (वय 29 रा. रामरहिम कॉलनी, अन्वर मशिदीजवळ, संजयनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मृत पांडुरंग, फिर्यादी गणेश व हल्लेखोर विश्वजित एकाच परिसरात राहतात. तिघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पांडुरंग हा गणेश कांबळे याच्या साईनगर येथील घरी जेवण करण्यासाठी गेला होता. सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित विश्वजित हा तिथे आला. तो थेट गणेशच्या घरात घुसला. पांडुरंगला घरात पाहताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

‘तु इथे का आला आहेस’ असे म्हणत त्याने खिशातून चाकू बाहेर काढत पांडुरंगच्या मांडीवर वार केला आणि घटनास्थळावरुन पळून गेला. जखमी अवस्थेत पांडुरंगला येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संजयनगर परिसरात खळबळ माजली. याबाबत गणेश कांबळे याने संजयनगर पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित विश्वजित माने याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याच्या शोधासाठी संजयनगर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती.

दरम्यानच्या काळात संशयित विश्वजित हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने येथील एस.टी. स्टँड परिसरात सापळा लावला. स्टँड परिसरात त्याचा शोध सुरु केला. रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित विश्वजित हा एस.टी. स्टँड स्टँडवर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विश्वजित सराईत गुन्हेगार

संशयित विश्वजित माने हा सराईत गुन्हेगार आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात अनेक गंभीर गुह्यांची नोंद आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी,  गर्दी अशा गुह्यांचा समावेश आहे. दरम्यान पांडुरंगच्या खुनाचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पाठीमागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा सुरु होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.