|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » टायर चोरीप्रकरणी संशयितांना अटक

टायर चोरीप्रकरणी संशयितांना अटक 

फोंडा पोलिसांचे चोवीस तासात तपासकार्य

वार्ताहर/ उसगांव

गावठण, पिळय़े-धारबांदोडा येथे पार्क करून ठेवलेल्या नव्या बसगाडीचे सुमारे रू. 90 हजार किंमतीचे सहा टायर चोरीप्रकरणी चोवीस तासात छडा लावण्यात फोंडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीघांना अटक केली आहे तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले आयचर कॅन्टर वाहन ताब्यात घेतले आहे. एलिसन पिकार्डो (26, रा. ओपा-खांडेपार), अशोक गावकर (39, साकोर्डा), चंदू हिरेकुरबार (29) अशी तीन संशयितांची नावे आहे. चौथा संशयित तिस्क उसगांव येथील सुजय नामक युवक अजून फरार आहे. सदर चोरीची घटना काल रविवारी सकाळी उघडकीस आली.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे होंडा सत्तरी येथे एसीजीएल कंपनीत बसबांधणीनंतर महाराष्ट्रातील मुंबई येथील शाळेत डिलीवरी देण्यासाठी चालक जाणार होता. त्यासाठी नव्या कोऱया वाहनाचे कायद्यानुसार तात्पुरते रजिस्ट्रेशन करण्यात आले होते. चालकाने शनिवारी रात्री गावठण पिळय़े येथे आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावर सुरक्षितरित्या पार्क करून ठेवली होती. यावेळी नव्या कोऱया वाहनाला स्टेपनीसह सात टायर होते. सकाळी डिलीव्हरी देण्यासाठी चालक वाहनाकडे आला असताना वाहनाचे सहा टायर गायब झाल्याचे प्रकार उघडकीस आला. त्यानंतर फोंडा पोलिसांनी माहिती केल्यानंतर तपासाची चक्रे सक्रिय करून फोंडा पोलिसांनी चोवीस तासात चोरीचा उलगडा करण्यात यश मिळवले.

सीसीटिव्ही कॅमेरामुळे चोरीचा उलगडा

तिस्क-उसगांव परीसरात मध्यरात्री एमआरएफ कंपनीची कर्मच्याऱयांना ने-आण करणारी प्रवासी बसची वर्दळ असते त्यावेळी काहीनी सुरक्षितरित्या वाहन पार्क करून ठेवलेले बघितले होते. त्यानंतर उशिरा रात्री हॉर्टीकल्चर भाजीच्या गाडय़ाची वाहने रस्त्यावरून ये-जा सुरू होते. त्याच दरम्यान हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलिसांना आल्यानंतर त्या दिशेने तपास करण्यात आला. त्यावेळी चोरीचे टायर वाहून नेलेले आयचर कॅन्टर सीसीटिव्ही कॅमेरात बंदिस्त झाल्याने चोरीचा उलगडा झाला. चोरटयानी पाठीमागील टायर काढताना वाहनाच्या झकचा उपयोग केला, मात्र पुढील चाक काढताना पाठीमागील झक मातीत रूतल्याने बसच्या चालकाच्या बाजूचा टायर न काढता चोरटयांनी घटनास्थळावरून पळ काढला. याकामी टायर पळविण्यात सहाय्य करणाऱया वाहनमालकाला वाहनासह ताब्यात घेतले आहे.  

फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सुरज हळर्णकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश वळवईकर, सहाय्यक उपनिरीक्षक गणपत पाटील, हवालदार केदारनाथ जल्मी, अमेय गोसावी, सुरज गावडे, सुरज गावकर यांनी ही कारवाई केली. संशयिताविरूद्ध भा.द.स. 379 व 427 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली असून फरार असलेल्या अन्य एका संशयिताचा शोध जारी आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.