|Sunday, August 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » गीत सरगम कार्यक्रमास गान रसिकांचा उदंड प्रतिसाद

गीत सरगम कार्यक्रमास गान रसिकांचा उदंड प्रतिसाद 

बेळगाव / प्रतिनिधी

स्वरतरंग संगीत मंच कोल्हापूर व शिवम म्युझिक क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गीत सरगम’ या कार्यक्रमास बेळगावच्या गान रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. रविवारी सायंकाळी येथील आयएमईआरच्या सभागृहात झालेल्या या संगीतमय कार्यक्रमातून गायक कलाकारांनी कराओके आधारित जुन्या, नव्या सुरेल गीतांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. सदर कार्यक्रम फॅन्स क्लब ऑफ ओल्ड फिल्म साँग्स यांनी प्रायोजित केला होता. तर रंग संपदाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी आणि डॉ. गिरीष जुमेय हे कार्यक्रमाचे संयोजक होते.

पद्माकर बहिरशेठ यांच्या ‘बेकरार करके हमे’ या बीस साल बाद या चित्रपटातील गीताने सुरूवात झाली. यानंतर जंजीर चित्रपटातील ‘दिल जलोंका दिल जलाके’ हे गीत रेखा यांनी गायिले, चंदवानी व तन्वी यांनी गाजलेले ‘धीरे धीरे बोल कोई सुनना ले’ हे गीत गाऊन रसिकांची दाद मिळविली. गुमराह चित्रपटातील ‘चलो इकबार फिरसे’ हे गीत प्रविण डी. यांनी गायिले. तर ‘आओ हुजुर तुमको’ हे सदाबहार गीत डॉ. सविता देसाई यांनी तितक्मयाच ताकदीने गायिले.

नाना निंबाळकर यांनी तेरे घरके सामने या चित्रपटातील ‘तू कहॉ ए बता’ हे अजरामर गीत पेश केले. यानंतर आतर्मलकर, चिखलीकर, विश्वनाथ दीवटे, निहाल व सरिता, जान्हवी, सचिन, घोरपडे आदी गायक कलाकारांनी जुन्या चित्रपटातील गाजलेली गीते सादर केली.  डॉ. अरविंद कुलकर्णी आणि डॉ. गिरीष जुमेय यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पुजनाने या गीत सरगम कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या मध्यंतरास या दोघांचाही संगीत प्रेमी मंचच्या वतीने सत्कार करण्यात आला.