|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बाजारहद्दवाढीचा मुद्दा पुन्हा अजेंडय़ावर

बाजारहद्दवाढीचा मुद्दा पुन्हा अजेंडय़ावर 

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्ड बाजार एरिया हद्दवाढीचा प्रस्ताव बारगळला होता. मात्र सोमवार दि. 27 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण बैठकीच्या अजेंडय़ावर हा विषय पुन्हा घेण्यात आला आहे. तसेच रेल्वे बस स्थानकात असलेले हॉटेल हटविण्यासह हेस्कॉमने अनधिकृत बांधकाम हाती घेतल्याबद्दल नोटीस बजावण्याचा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर आहेत.

कॅम्पमधील बाजार हद्दवाढीचा मुद्दा अद्याप निकालात काढण्यात आला नाही. यामुळे बाजार हद्दवाढीसह प्रलंबित असलेले अनेक विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आले आहेत. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत रेल्वे बसस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ झाला, पण सदर जागा स्मार्टसिटी कंपनीकडे हस्तांतर करण्यात आली नसल्याने कामाची सुरुवात झाली नाही. तसेच जुना धारवाड रोड परिसरातदेखील विविध विकासकामे राबविण्यात येणार आहेत. यामुळे परिसरात असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड व्यापारी संकुलाच्या गाळय़ातील भाडेकरूंना मुदतवाढ देण्यात आली नाही. पण स्मार्टसिटीचे काम कधी सुरू होणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. स्मार्टसिटीची कामे रखडल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डलादेखील गाळय़ांच्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात अडचण होत आहे.

रेल्वेस्थानक बसस्थानकाच्या विकासकामाला प्रारंभ करण्याकरिता याठिकाणी असलेल्या भाडेकरूना हटविण्याची गरज आहे. पण ही प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याने काम रखडले आहे. यामुळे याठिकाणी असलेले हॉटेल हटविण्याबाबत चर्चा करण्यासाठी हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला आहे. तसेच रेल्वे बसस्थानकालगत असलेल्या हेस्कॉम कार्यालयाचे काम विनापरवाना करण्यात येत असल्याने नोटीस बजावण्याचा प्रस्ताव आहे. एकूण 34 विषय असून यामध्ये जुना धारवाड रोड येथील गाळय़ांच्या लीजवाढीचा आणि रेल्वेस्थानक आवारात असलेल्या ऍक्ट्राय नाका इमारतीमधील भाडेकरूचा मुद्दा आहे. तसेच मतदारयादी तयार करण्याच्यादृष्टीने या प्रस्तावावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

किल्ला भाजी मार्केटचे स्थलांतर करण्यात आले आहे. यामुळे किल्ला भाजी मार्केटमधील गाळे हटविणार की, याठिकाणी नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. पण हा विषय बैठकीच्या अजेंडय़ावर घेण्यात आला नाही..