|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अथणीत पोलिसांकडून वाहन चालकांची लूट

अथणीत पोलिसांकडून वाहन चालकांची लूट 

प्रतिनिधी/ बेळगाव

अथणी परिसरात वाहनांची तपासणी करण्याच्या बहाण्याने पोलिसांनी वाहन चालकांची लूट सुरू केली आहे. रविवारी सायंकाळी अथणी-अनंतपूर रस्त्यावर अक्षरशः वाहन चालकांची लुट करण्यात येत होती. पोलिसांच्या या मनमानी कारभाराला आवर कोण घालणार? असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करीत आहेत.

रविवारी सायंकाळी केए 22 जी 652 क्रमांकाची जीप अथणी-अनंतपूर रोडवरील वीटभट्टीजवळ उभी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. खास करुन दुचाकीस्वारांना अडवून कागदपत्रांची मागणी करण्यात येत होती. कागदपत्रे दाखविल्यानंतरही प्रत्येकी 300 रुपये घेऊन त्यांची सुटका केली जात होती.

पैसे दिले नाहीत तर तशा दुचाकीची चावी काढून अधिकारी व पोलीस आपल्या खिशात टाकत होते. पैसे दिल्यानंतरच चावी वापस देत होते. अनेक दुचाकीस्वारांनी या संबंधी तरुण भारतशी संपर्क साधून या प्रकाराबद्दल तक्रार केली. सायंकाळी उशीरापर्यंत ही लुट सुरूच होती.

तरुण भारतने जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. कोणत्याही प्रकारची पावती न देता प्रत्येक दुचाकी व इतर वाहन चालकांकडून 300 ते 500 रुपये वसूल करण्यात येत होते. ही रक्कम कुठे जाते?, दुचाकीस्वारांजवळ कागदपत्रे नसतील तर दंड घालून त्याची पावती का दिली जात नाही? अशी विचारणा केली असता या प्रकरणाची चौकशी करण्याचे पोलीस प्रमुखांनी सांगितले.

नियमानुसार पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या खालच्या अधिकाऱयांना दंडात्मक कारवाईचा अधिकार नाही. तरीही अथणी-अनंतपूर रोडवर रविवारी वाहन चालकांना अक्षरशः लुटण्यात येत होते. पोलीस प्रमुख व पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालये अथणीपासून 150 कि.मी. अंतरावरील बेळगावात आहेत. त्यामुळे आमचे कोण काय करणार? या थाटात अथणी पोलीस लुटमारीला उतरले असून पोलीस प्रमुखांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.