|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शुक्रवारपेठेत जलवाहिनीला गळती

शुक्रवारपेठेत जलवाहिनीला गळती 

प्रतिनिधी/ बेळगाव

पहिले रेल्वेगेट ते गोवावेसपर्यंतच्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण करून जोडणी करण्यात येत आहे. मात्र, शनिवारी रस्त्याची खोदाई करताना जलवाहिनी फुटली आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात गळती लागल्याने पाणी वाया गेले.

येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू करून चार वर्षे होत आली, पण अद्यापही काही विकासकामे राबविण्यात येत आहेत. स्मार्टसिटी योजनेमधून रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करून ठेवण्यात आली असल्याने ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदाई करताना येथील जलवाहिनी फुटली आहे. रविवारी सुटी असल्याने गळती निवारण्याचे काम पाणीपुरवठा मंडळाने हाती घेतले नाही. सदर वाया जाणारे पाणी गटारीमधून जवळपासच्या विहिरीत पाझरत आहे. यामुळे विहिरीचे पाणी दूषित झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

शहरात आठ-दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात जलवाहिन्यांचे नुकसान झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जलवाहिनी गळतीमुळे पाणीपुरवठा बंद करण्यात आला. परिणामी नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली. यामुळे विकासकामे राबविताना जलवाहिन्यांची काळजी घेण्याची मागणी होत आहे.