|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आंध्र प्रदेशमधील भामटय़ाला अटक

आंध्र प्रदेशमधील भामटय़ाला अटक 

बैलहोंगल पोलिसांची कारवाई,लक्ष विचलित करून लुटणारी टोळी सक्रिय

प्रतिनिधी/ बेळगाव

लक्ष विचलित करून लुटणाऱया टोळीच्या कारवाया केवळ बेळगाव शहरातच नव्हे तर जिल्हय़ातील इतर ठिकाणीही वाढल्या आहेत. गेल्या 20 दिवसांपूर्वी बैलहोंगल येथील बँकेतून 2 लाख रुपये काढून घरी चाललेल्या एका तरुणाचे लक्ष विचलित करून त्याच्याजवळील रोकड पळविण्यात आली होती. या घटनेमागे आंध्रप्रदेशमधील टोळी सक्रिय असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

शनिवारी बैलहोंगल पोलिसांनी आंध्र प्रदेशमधील एका भामटय़ाला अटक केली असून त्याचा आणखी एक साथीदार अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जपानीया मस्तान पुलीकोटी (वय 24, रा. कपरालतीप्पा, पोस्ट दामवरम्, ता. कावली, जि. नेल्लोर) असे त्याचे नाव आहे.

जपानीयाचा साथीदार राजू प्रसाद कुंचाला (रा. कपरालतीप्पा) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या टोळीने रायबाग येथेही हातचलाखी केल्याची कबुली दिली आहे. बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक एम. एस. कुसगल, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. हुगार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. के. जैनर, ए. जी. साली, एन. व्ही. परड्डी, एस. एम. बसरीकट्टी, बी. एम. चिलकंडी, आर. करिगार, एस. एच. हादीमनी, डी. एच. नदाफ, यु. आर. पट्टेद आदींनी ही कारवाई केली.

6 मे रोजी दुपारी 2.05 वाजता विद्यानगर, बैलहोंगल येथील सोलबय्या सोमय्या हिरेमठ यांनी एसबीआय शाखेतून 2 लाख रुपये काढले होते. आपल्या लॅपटॉप बॅगमध्ये पैसे ठेवून कारमधून ते घरी जात होते. त्यावेळी कार पंक्चर झाल्याचे सांगून दोघा भामटय़ांनी त्यांचे लक्ष विचलित करून 2 लाख रुपये असलेली बॅग पळविली होती. हा प्रकार लक्षात येताच सोलबय्या यांनी भामटय़ांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी दोन्ही भामटय़ांनी त्यांना ढकलून पल्सर मोटारसायकलवरून पलायन केले होते. या टोळीने केवळ बैलहोंगलमध्येच नव्हे तर नरगुंद व रायबाग येथेही गुन्हे केल्याची कबुली दिली असून आरोपीजवळून एक पल्सर मोटारसायकल, 2 लाख 14 हजार 500 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.