|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अगसगा येथे वृद्धावर हल्ला करून दोन म्हशी पळविल्या

अगसगा येथे वृद्धावर हल्ला करून दोन म्हशी पळविल्या 

दागिन्यांबरोबरच आता जनावरेही असुरक्षित

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या तीन महिन्यांपासून शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांचा आलेख वाढला आहे. दागिने व मालमत्तांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच आता जनावरेही चोरीस जात आहेत. अगसगा (ता. बेळगाव) येथे एका वृद्धाचे हात-पाय बांधून त्याच्यावर हल्ला करून दोन म्हशी पळविण्यात आल्या आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

अगसगा गावाजवळच एका शेतकऱयाने शेडमध्ये पाच म्हशी व एक गाय पाळली होती. मूळच्या बैलहोंगलच्या व सध्या कंग्राळी खुर्द येथे वास्तव्यास असणाऱया प्रिया पुंडलिक सोमनट्टी यांनी दुग्ध व्यवसायासाठी जनावरे पाळली होती. शनिवारी मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास शेडमध्ये आलेल्या चौघा जणांनी वृद्धाचे हात-पाय बांधून त्याच्यावर हल्ला केला आहे. त्यानंतर मुर्रा जातीच्या सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीच्या दोन म्हशी पळविल्या आहेत. दरोडेखोरांच्या हल्ल्यात आप्पाजी मल्लाप्पा शेलार (वय 60) हा वृद्ध जखमी झाला असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी, बेळगाव ग्रामीणचे एसीपी के. शिवारेड्डी, काकतीचे पोलीस निरीक्षक एल. एच. गवंडी, उपनिरीक्षक अर्जुन हंचिनमनी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अगसगा गावापासून जवळच डेअरी फॉर्म आहे. या शेडमध्ये एकूण 10 म्हशी व गायी होत्या. गेल्या आठ महिन्यांपूर्वी दुग्ध व्यवसायासाठी हे शेड बांधून वेगवेगळय़ा राज्यातील मुर्रासह उत्तम प्रतीच्या म्हशी बांधण्यात आल्या होत्या. प्रिया सोमनट्टी यांना दुग्ध व्यवसाय करण्याची आवड आहे. त्यामुळेच त्यांनी हा व्यवसाय थाटला आहे.

दिवसभर जनावरांची व्यवस्था करण्यासाठी कामगार असतात. आप्पाजी शेलार हे रात्री शेडमध्ये झोपण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास ते डेअरी फार्मला पोहोचले. मध्यरात्री ते झोपलेले असताना 1.30 वाजण्याच्या सुमारास शेडमध्ये दाखल झालेल्या चौघा जणांनी जनावरांच्या दोऱया कापण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस येताच आप्पाजी यांनी प्रतिकार केला. त्यांचे हात-पाय बांधून त्यांना बेदम मारहाण करून गुन्हेगारांनी दोन म्हशी पळविल्या आहेत.

ग्रामीण भागात उन्हाळय़ात जनावरे बाहेर बांधली जातात. जनावरांची चोरी अधूनमधून होत असते. मात्र वृद्धावर हल्ला करून जनावरे पळविण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना असून यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. रविवारी या संबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

आठ दिवसांपूर्वी तीन म्हशींची चोरी

केवळ आठ दिवसांपूर्वी आंबेवाडी येथील मल्लाप्पा भैरू भातकांडे (वय 48) या शेतकऱयाच्या आंबेवाडी-अलतगा रस्त्यावरील शेडमधून तीन म्हशी चोरण्यात आल्या आहेत. गेल्या शुक्रवारी 17 मे रोजी पहाटे चोरीची ही घटना उघडकीस आली होती. चोरटय़ांनी गुज्जर, गवळट व काठेवाडी जातीच्या तीन म्हशी पळविल्या असून शेडमध्ये कोणीही नसताना ही चोरी झाली आहे. यासंबंधी काकती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच शनिवारी मध्यरात्री वृद्धावर हल्ला करून दोन म्हशी पळविण्यात आल्या आहेत.