|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » दुष्काळीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार

दुष्काळीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार 

प्रतिनिधी/ सातारा

सध्या सातारा जिल्हय़ासह राज्यात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात 14 हजार गावे दुष्काळात होरपळत असून 6 हजार टँकरद्वारे पाणी पुरवण्यात येत आहे. 37 हजार रोजगार हमीची कामे सुरु असून साडेतीन लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याची माहिती असली तरी मग दुष्काळी भागातील नागरिकांच्या तक्रारी का आहेत? टँकरच्या फेऱया कमी टाकून त्यात भ्रष्टाचार सुरु असल्याची ओरड सुरु असून याबाबत मी तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटणार असून शपथविधीनंतर पंतप्रधानांना भेटून जनतेला दिलासा देण्याची मागणी करणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. दरम्यान, पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा असून टँकरच्या माध्यमातून लूट करणाऱया टँकरमाफियांना रोखा, असा इशाराही त्यांनी दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजे म्हणाले, झालेल्या बैठकीत सातारा जिल्हय़ातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला. जिल्हय़ाच्या वाटणीचे पाणी जिल्हय़ालाच मिळाले पाहिजे. रोजगार हमीची कामे सुरु आहेत की नाही, मजुरी कमी दिले जात आहे. छावणीवरील शेतकऱयांना मोठय़ा जनावरांसाठी 100 तर छोटय़ा जनावरांसाठी 50 रुपये देण्यात येत आहेत. त्यात वाढ केली पाहिजे याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकाऱयांना परिस्थितीचा आढावा मागितला असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.

राज्यात दीड हजार चारा छावण्या

दुष्काळी स्थिती भयानक होवू लागली असून यापुढे पाण्यासाठी युध्दे होतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी देखील टंचाई परिस्थितीत पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. दुष्काळात तातडीने मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक अधिकारी नियुक्त करा. टोल फ्री क्रमांक सुरु करुन 24 तास त्यावर मदत मिळण्याची सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या असल्याचे सांगून उदयनराजे म्हणाले, सध्या राज्यात दीड हजार चारा छावण्या असून त्यात 9 लाख मोठी जनावरे व 1 लाख छोटी जनावरे आहेत. मात्र जे शेतकरी छावणीत त्यांना जगवण्यासाठी झटत आहेत त्यांना मोठय़ा जनावरांसाठी 200 रुपये तर छोटय़ा जनावरासाठी 100 रुपये भत्ता देण्याची गरज आहे.

शेतकऱयांसाठी इरमा योजना हवी

भूमाता दिंडीपासून डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्याबरोबर मी देखील देशातील शेतकऱयांसाठी इरमा म्हणजे इन्कम अँड रिस्क मॅनेजमेंट फॉर ऍग्रीकल्चर ही योजना राबवा असे सांगत आहे. त्याचा पाठपुरावा आम्ही करत आहोत मात्र प्रशासन नावाची यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. ऍग्रीकल्चरसाठी काम करणाऱया कंपन्यांना 2 लाख कोटी रुपयांची सबसिडी देता त्यापेक्षा हाच सबसिडीचा पैसा शेतकऱयांच्या उन्नतीसाठी खर्च झाला पाहिजे. अचानक उद्भभवणारी गारपीट, दुष्काळ यासाठी सबसिडी देवून केंद्र व राज्य शासनाने हमी घेवून शेतकरी विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Related posts: