|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दिल्ली पोलिसांनी हाणून पाडले 11 हल्ल्यांचे कट

दिल्ली पोलिसांनी हाणून पाडले 11 हल्ल्यांचे कट 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी विभागाच्या विशेष शाखेने मागील एक वर्षात 11 दहशतवादी हल्ल्यांचे कट हाणून पाडले आहेत. विशेष शाखेने एकूण 11 मोठय़ा मोहिमा राबविल्या असून यातील 4 मागील चार महिन्यांमध्येच पार पडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी केवळ दिल्ली नव्हे तर जम्मू-काश्मीर, नेपाळ सीमा आणि ईशान्य भारतातील संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेत धडक कारवाई केली आहे. या मोहिमांच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्यांचे कट हाणून पाडल्याचे दिल्ली पोलिसांच्या एका दस्तऐवजात नमूद करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे ठोस पुरावे जमविण्यास मदत केली आहे. जम्मू-काश्मीरमधील इस्लामिक स्टेटचे मॉडय़ूल उघड करण्यात देखील राष्ट्रीय राजधानीच्या पोलिसांची महत्त्वाची भूमिका होती. याचबरोबर मणिपूरमध्ये सक्रीय दहशतवादी संघटना कांगलेपक कम्युनस्टि पार्ट-पीपल वॉर ग्रूपच्या उग्रवाद्यांच्या मुसक्या आवळण्याचे कामही दिल्ली पोलिसांकडून झाले आहे.

14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. दिल्ली पोलिसांनी या हल्ल्यात सामील सज्जाद अहमद खानला लाजपत राय बाजारपेठेतून ताब्यात घेतले होते. सज्जाद दिल्लीत शालविक्रेत्याच्या स्वरुपात लपून बसला होता. काश्मीरच्या सज्जादला अटक करण्यासह दिल्ली पोलिसांनी हल्ल्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे धागेदारे सुरक्षा यंत्रणांना उपलब्ध केले होते. सज्जाद हा हल्ल्याचा सूत्रधार मुदसिर खानचा सहाय्यक होता. त्याच्या अटकेमुळे यंत्रणांना हल्ल्यात सामील सर्व दहशतवाद्यांची ओळख पटविण्यास आणि अटक करण्यास मदत झाली होती. याचबरोबर मार्च महिन्यात दिल्ली पोलिसांनी हिजबुल मुजाहिदीनची दोन मॉडय़ूल्स उद्ध्वस्त केली होती.

हल्ल्याचा कट हाणून पाडला

विशेष शाखने प्रजासत्ताक दिनाच्या काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अब्दुल लतीफ गनी आणि हिलाल अहमद भटच्या मुसक्या आवळल्या होत्या. हे दोन्ही दहशतवादी राजधानीच्या गर्दी असलेल्या भागामध्ये ग्रेनेड हल्ला करण्याच्या तयारीत होते. डिसेंबर महिन्यात दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसह राबविलेल्या संयुक्त मोहिमेत इस्लामिक स्टेटच्या तीन दहशतवाद्यांची धरपकड करत त्याचे मॉडय़ूल नष्ट केले होते.

सफरचंदाच्या बागेत खंदक

इस्लामिक स्टेटचे तीन दहशतवादी ताहिर अली खान, हारिस मुश्ताक खान आणि आसिफ सुहैव नदाफला दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी सफरचंदाच्या एका बागेतून अटक केली होती. तिन्ही दहशतवादी खंदक तयार करून त्यात लपले होते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात दिल्ली पोलांनी सिमी दहशतवादी अब्दुल सुभान कुरैशी आणि इंडियन मुजाहिदीनच्या आरिज खानला पकडले होते. या कारवाईमुळे पोलिसांना भारतात पुन्हा डोकं वर काढण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या इंडियन मुजाहिदीनला रोखण्यास मदत मिळाली होती.

 

 

Related posts: