|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » दोन दिवसात मान्सून केरळात

दोन दिवसात मान्सून केरळात 

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची चिन्हे

प्रतिनिधी / पुणे

येत्या 48 तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, मान्सूनची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होऊ शकेल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविला आहे. दरम्यान, हवामान विभागानेही 6 जूनपर्यंत मान्सून केरळात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

मागच्या 18 मे रोजी अंदमानात मान्सून दाखल झाला. मात्र, त्यानंतरचा त्याचा प्रवास अडथळय़ाचा राहिला. आता मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. पुढच्या 24 तासांत दक्षिण अरबी समुद्राचा बराचसा भाग, मालदीव कॅमरोन, मध्य बंगालचा उपसागराचा भाग तो व्यापेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे येत्या 48 तासांत अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार 7 जूनला मान्सून केरळात दाखल होऊ शकतो. यात एक-दोन दिवस मागे पुढे होऊ शकते, असे स्कायमेटने म्हटले आहे.

12 जूनला महाराष्ट्रात

हवामान विभागाने यंदा 96 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यंदा पाऊस दुष्काळ धुऊन काढेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळलेल्या राज्यांना मान्सून कधी येणार, याची चिंता आहे. मान्सून 6 जूनला केरळात, तर 12 जूनला राज्यात येईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

गोव्यासह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

दुसरीकडे हवामान विभागाने येत्या 6 जूनपर्यंत म्हणजेच दोन दिवसांत मान्सून केरळात सक्रीय होईल, असा अंदाज वर्तविला आहे. मागच्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर विदर्भासह राज्याच्या काही भागांत उष्णतेची लाटही होती. कोकण व गोव्यातील तापमानातही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. सर्वाधिक 46.7 अंश सेल्सिअस तापमान ब्रम्हपुरी येथे नोंदविण्यात आले. येत्या दोन दिवसांत कोकण-गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे.

मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह व सोसाटय़ाच्या वाऱयासह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर विदर्भ व मराठवाडय़ात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Related posts: