|Thursday, January 23, 2020
You are here: Home » Top News » मोठय़ा शहरांमध्ये लहान मुलांचे ‘बोन्साय’

मोठय़ा शहरांमध्ये लहान मुलांचे ‘बोन्साय’ 

  पुणे / प्रतिनिधी :  पुणे, मुंबई, नाशिक यासारख्या मोठय़ा शहरांमध्ये लहान मुलांसाठी फारसे काही नाही. उद्याने, मैदाने, प्राणी संग्रहालयांचीही सध्या वानवा असून, आज लहान मुले हा सगळय़ात दुर्लक्षित घटक आहे. त्यांना आपण आपल्यासारखे बोन्साय करत असल्याची खंत अभिनेते वैभव मांगले यांनी बुधवारी येथे व्यक्त केली.

‘संवाद, पुणे’च्या वतीने ‘अलबत्या-गलबत्या’ नाटकामध्ये चेटकिणीची भूमिका करणारे वैभव मांगले यांचा बालसाहित्यकार राजीव तांबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आणि ‘संवाद, पुणे’चे सुनील महाजन यांनी त्यांची मुलाखत घेतली. मांगले म्हणाले, मोठय़ा शहरांमध्ये लहान मुलांसाठी काहीच नाही. लहान मुले हा कायम दुर्लक्षित घटक राहिला आहे. त्यांचा आपण बोन्साय करत आहोत. यामध्ये पालकांचाही दोष आहे. मुलांना आपण काही उपलब्ध करून देत नाही. बालमानसशास्त्रही एक भाग असतो. तो आपण समजून घ्यायला हवा.

‘अलबत्या-गलबत्या’ ही सामाजिक घटना आहे. माझ्या भूमिकेमुळे मी लहानांबरोबर मोठय़ांनाही खिळवून ठेवतो. चिंची चेटकीण विनोदी असली, तरी एका क्षणात मी गंभीर करतो. मी शिक्षक असल्याने मुलांना कुठल्या भावविश्वात घेऊन जायचे मला माहीत आहे. माझी चेटकीण ही खटय़ाळ, विनोदी आहे. त्यामुळे मुले चेटकिणीवर मनापासून प्रेम करतात. बालनाटय़ात काम करणे, ही माझी खेळी होती. बालनाटय़ आणि माझी इतर नाटके यांची तुलना होऊ शकत नाही. मी बालनाटय़ करायचे ठरवले, तेव्हा बालनाटय़ रंगभूमीवर कुणीही नव्हते. त्यामुळे ही माझ्यासाठी सुवर्णसंधी होती. पुरस्कारापेक्षा प्रेक्षकांचा हाऊसफुल्लचा बोर्ड लागतो, तेव्हा ते पुरस्कारापेक्षा मोठे असते. त्यामुळे दखल घेतली नाही, याची खंतही वाटली नाही, असेही ते म्हणाले.

संगीताप्रमाणे आवाजाचाही रियाज असतो. आवाजाची पट्टी महत्त्वाची असते. नटाला आवाज फिरवता आला पाहिजे. आवाजाच्या रियाजामुळे मला चिंची चेटकीण करताना फायदा झाला. पुढील तीन वर्षात अलबत्या-गलबत्या नाटकाचे एक हजार प्रयोग करणार असल्याचेही मांगले यांनी सांगितले.

मी गाण्यात रमणारा माणूस आहे. मला गायक व्हायचे होते. पण, परिस्थितीमुळे मला गायक होता आले नाही. मी जर गायक असतो, तर अभिनय क्षेत्राकडे वळलो नसतो. किशोरीताई मला गाण्यातील गौरीशंकर वाटतात. मी संवेदनशील कलाकार आहे. ते मला त्यांच्या गायनात दिसते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

 

Related posts: