|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » लघुपटाच्या माध्यमातून देशाला ऑस्कर मिळू शकतो

लघुपटाच्या माध्यमातून देशाला ऑस्कर मिळू शकतो 

 पुणे / प्रतिनिधी : 

 लघुपट हे तरुणांचे माध्यम आहे. या माध्यमातून तरुण आज व्यक्त होत आहेत. परंतु त्याला ज्या प्रमाणात हवे त्या प्रमाणात  महत्त्व  दिले जात नाही. ऑस्कर पुरस्कारांमध्येही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लघुपटाच्या माध्यमातून भविष्यात देशाला ऑस्कर पुरस्कार मिळू शकतो असा विश्वास ऑस्कर पुरस्कारांचे परीक्षक उज्ज्वल निरगुडकर यांनी व्यक्त केले.

 आम्ही पुणेकर आणि मराठी चित्रपट परिवार संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या पुणे लघुपट महोत्सवाचे उद्घाटन उज्ज्वल निरगुडकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, समीर देसाई यावेळी उपस्थित होते.

 निरगुडकर म्हणाले, ऑस्कर पुरस्कारांमध्ये आपण केवळ विदेशी चित्रपट विभागावरच लक्ष देतो. परंतु ऑस्कर पुरस्कारांमध्ये असलेल्या चार इतर विभागांकडे  लक्ष देणे गरजेचे आहे. हे सर्व विभाग माहितीपट आणि लघुपटांच्या संदर्भातील आहेत, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून याकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला ऑस्कर मिळू शकलेले नाही. लघुपट तरुणांचे माध्यम आहे. या माध्यमातून तरुण व्यक्त होऊ पाहत आहे. या माध्यमाकडे  आपण चांगल्या पद्धतीने लक्ष दिले तर एके दिवशी आपण या भागातून ऑस्कर पुरस्कारही जिंकू शकतो.

ऑलम्पिक स्पर्धाना आपण ज्याप्रमाणे महत्त्व देतो त्याचप्रमाणे ऑस्कर पुरस्कार कान्स आणि बर्लिन चित्रपट महोत्सवनाही  महत्त्व दिले पाहिजे. यासाठी खेळामध्ये ऑलम्पिक पदक जिंकण्यासाठी जसे प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे अशा महोत्सवात आणि पुरस्कारांमध्ये आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी प्रशिक्षण देणाऱया संस्थांची आज गरज आहे. असेही उज्ज्वल निरगुडकर यांनी यावेळी सांगितले.

 रविवार पर्यंत प्रभात रोडवरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रोज सकाळी सहा ते सायंकाळी पाच या वेळेत हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवामध्ये विविध देशातील 100 हून अधिक लघुपट दाखवण्यात येणार आहेत. रविवारी दि. 9 सायंकाळी चार वाजता महोत्सवाचे पारितोषिक वितरण होणार आहे.