|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » युतीत दबावतंत्र, आघाडीत अभावतंत्र!

युतीत दबावतंत्र, आघाडीत अभावतंत्र! 

लोकसभेला घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर महाराष्ट्रात भाजपने पुन्हा एकदा दबंगगिरी सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेनेने सावध भूमिका घेत दुष्काळ, अयोध्या दौऱयाची घोषणा केली. पण, विरोधी आघाडी अजूनही सुस्तच आहे.

 

महाराष्ट्र हा कधीकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला आता पुरता ढासळू लागलेला आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले तेव्हा शिवसेना आणि भाजपचे काही जुळत नाही अशी स्थिती होती. मात्र भाजपने थोडे नमते घेत, शिवसेनेशी थोडे जुळवून घेत महायुती घडवली. त्यांच्या आधी काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी घडली होती. प्रचारही सुरू झाला होता. पण, नेत्यांचा हट्ट, दुराग्रह, मित्र पक्षाच्याच पायात पाय घालण्याची वृत्ती आणि इतर शक्तींना तुच्छ लेखण्याची किंमत त्यांना भोगावी लागली आहे. आकडेवारीच्या दृष्टीने विचार केल्यास लोकसभा 2019 च्या निवडणुकीत 27.59 टक्के मतदारांनी भाजपला तर 23.29 टक्के मतदारांनी शिवसेनेला मतदान केले. काँग्रेस 16.26 टक्के तर राष्ट्रवादीने 15.52 टक्के मते मिळवली आहेत. त्या बदल्यात अनुक्रमे 23, 18, 1 आणि 5 जागा त्या पक्षांना मिळाल्या. एमआयएमने एक जागा जिंकली. 2014 च्या निवडणुकीपेक्षा भाजपचा आकडा अर्धा तर सेनेचा 3 टक्क्यांनी वाढला आहे. पाव टक्क्याने काँग्रेसची मते वाढली आहेत. तर साडेतीन टक्क्यांनी राष्ट्रवादीची कमी झाली आहेत. गतवेळी लोकसभेनंतर चारच महिन्यांनी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्ष स्वबळावर लढले होते. तेव्हाही भाजपने 1 कोटी 47 लाख 09,455 (28.1 टक्के) मते घेतली होती. शिवसेनेने 1 कोटी 02 लाख 35,972 (19.5 टक्के), काँग्रेसने 94 लाख 96144 (18.1 टक्के) तर राष्ट्रवादीने 91 लाख 25299 (17.4 टक्के) मते घेतली होती. गत लोकसभा आणि विधानसभेला भाजप, शिवसेनेने मिळून 47 टक्के मतांचा वाटा उचलला होता आताच्या लोकसभेला तो 50 टक्क्यावर पोहोचला आहे! यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने औरंगाबादची एक जागा जिंकून 0.72 टक्के मते मिळवली आहेत. तर इतरांची 14.55 टक्के मते आहेत. ज्यात वंचित आघाडीच्या इतर उमेदवारांची मते मोठय़ा संख्येने आहेत. प्रकाश आंबेडकर यांना हलक्यात मोजणे काँग्रेस-राष्ट्रवादीला किमान 15 ठिकाणी तरी महागात पडले आहेच शिवाय कुणालाही फायदा होवो त्याचा आम्ही विचार करणार नाही म्हणणाऱया प्रकाश आंबेडकर यांना स्वतःलाही मतविभागणीमुळेच लोकसभेत पोहोचता आलेले नाही. या निवडणुकीत काँग्रेस संघटनेचाच नव्हे तर कार्यशैलीचाही पराभव झालेला आहे. काँग्रेसचे जे विकासाचे मॉडेल होते त्याचाच वापर काँग्रेसच्या पराभवासाठी करण्यात आला आहे. भाजपच्या विखे पाटलांसह अनेक उमेदवार काँग्रेसचेच होते यातच सर्व येते. वरील सर्व वास्तवांना पाठीवर घेऊन चार महिन्यांनी होणाऱया विधानसभा निवडणुकांना सोमोरे जावे लागणार आहे. विधानसभेचे ताणतणाव, प्रश्न वेगळे आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शहरी-ग्रामीण आर्थिक ताणतणाव नव्या स्वरूपात पुढे येणार आहेत. त्यावेळी विरोधकांनी स्वतःचा कायाकल्प करणे आवश्यक ठरणार आहे. सत्ताधारी पक्षांची जबाबदारी लोकसभेच्या निवडणुकीने वाढवली आहे. त्यांच्यावर जनतेने जो विश्वास टाकला त्याबरोबरच दुष्काळ, शेतमालाचे दर, आरक्षण या मुद्यांचा जाब द्यावाच लागणार आहे. दुष्काळी पट्टय़ातही लोकसभेला यश मिळाले असले तरी विधानसभेला सरकारचा कस लागणार आहे. पण, आज 50 टक्के मतदान एका बाजूला एक गठ्ठा झालेले आहे हे सर्वात मोठे वास्तव आहे. दोघांकडे मिळून विधानसभेच्या 288 पैकी 185 जागा आहेत. दुसरीकडे आंबेडकर राष्ट्रवादीवर आणि राष्ट्रवादी आंबेडकरांवर संशय घेत आहे. गत विधानसभेला भारीप बहुजन महासंघाने 4 लाख 72,925 मते घेतली होती. ही टक्केवारी 0.9 टक्के होती. एमआयएमने ही तेवढीच 4 लाख 48,614 मते घेतली होती. मनसे 16 लाख 65033 3.2 टक्के, शेकापक्षाची 5 लाख 33309 1 टक्का मते, मार्क्सवाद्यांची 2 लाख, बहुजन विकास आघाडीचे 3 लाख 29457 0.6 टक्के, स्वाभिमानी पक्षाची 3 लाख 48906, बसपची 11 लाख 91749, अपक्षांची 24 लाख 94016 म्हणजे साडेचार टक्के मते लक्षात घेतली तर या सगळय़ा मतांना भाजप-शिवसेनेच्या विरोधात एकत्र आणणे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसमोरचे आव्हान आहे. त्यातही काही पक्ष दोन्ही काँग्रेसची दारूण स्थिती बघून सत्ताधारी आघाडीशीच जुळवून घेऊ शकतात. आंबेडकर, राज ठाकरे, नारायण राणे, राजू शेट्टी, डावे, शेकाप अशा सर्वांना एकत्र आणून एकास एक पॅनेल उभे केले तरच कुठेतरी सर्व विरोधकांचा ठाव लागेल. अन्यथा 1999 ते 2009 या दहा वर्षात भाजप शिवसेनेची जी अवस्था झाली होती तशी अवस्था विरोधकांची होऊ शकते. त्याकाळात सेना, भाजपकडे गमावण्यासारखे काहीही नसल्याने त्यांचे आमदार त्यांच्याच पक्षासोबत राहिले. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गमावण्यासारखे अजूनही बरेच काही आहे. अनेकांना ऑफर्स आहेतच आणि त्या डावलून सरकार नावाची टांगती तलवार डोक्यावर पाहत कितीजण तग धरणार हाही प्रश्नच आहे. संघटनेसाठी न झटता केवळ स्वतःपुरते बघायची नेत्यांना सवय लावून ती खपवून घेतल्याचे फटके सध्या दोन्ही काँग्रेसला बसत आहेत. त्यातूनच दुसऱयाच्या नातवाला रोखता आले नाही आणि स्वतःच्या नातवाला वाचवता आले नाही अशी राष्ट्रवादीची स्थिती झाली, तर नसती आफत ओढवून घ्यायची वेळ काँग्रेसवर आली आहे.

भाजप-शिवसेना गेल्यावेळी वेगळे लढून एकत्र आले होते. आता त्यांना एकीचे महत्त्व कळले असले तरी, चंद्रकांत खैरे यांचा पराभव कटुतेला कारण ठरणारा आहे. शिवाय केंद्रात भाजपला स्वतःच्याच स्पष्ट बहुमताइतक्या जागा मिळाल्याने मित्रपक्षांच्या बाबतीत त्यांचे धोरण कसे राहील हेही पहावे लागणार आहेच. लोकसभेच्या तडजोडीत हक्काची पालघरची जागा उमेदवारासकट देणारा भाजप विधानसभेला निम्म्या निम्म्याचा फॉर्म्युला आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदांच्या बाबतीत कोणती भूमिका घेतो यावरही बरेच अवलंबून असणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची राज्यात सुरू असलेली चढाओढ आणि राजकीय चुरस बघता राष्ट्रवादी शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपसमोर आणखी काही पर्याय ठेवतो की काँग्रेस आघाडीचे नेतृत्व स्वतःच्या हाती घेतो हे काळच ठरवणार आहे. पण, आजच्या घडीला तरी विधानसभेला शिवसेना आणि भाजपपुढे टिकाव धरणे दोन्ही काँग्रेससाठी मुष्किलीचे आहे हेच अधोरेखित होत आहे.

 

शिवराज काटकर