|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » महाराष्ट्रात दहावीचा 77.10 टक्के निकाल

महाराष्ट्रात दहावीचा 77.10 टक्के निकाल 

चालू दशकातील दुसरी मोठी घसरण

पुणे / प्रतिनिधी

 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल 77.10 टक्के लागला असून मुलींनी यंदाही निकालात बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींचा निकाल 10.64 टक्क्यांनी जास्त आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वांत जास्त 88.38 टक्के इतका असून, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 67.27 नोंदवला गेला आहे. यंदा केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

शत-प्रतिशतची संख्या घटली

दहावीच्या निकालात अतिरिक्त गुणांमुळे काही विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के गुण मिळतात. यंदा ही संख्यादेखील घटली आहे. यावेळेस केवळ 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. मागील निकालात 125 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले होते. विशेष म्हणजे विद्येचे माहेरघर असणाऱया पुण्यात एकही 100 टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी नाही. तर लातूर विभागात तब्बल 16 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. औरंगाबाद विभागात 3, तर अमरावती विभागात एका विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता कळली : विनोद तावडे

यंदा दहावीचा निकाल जरी कमी लागला असेल तरी अनेकांनी या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमुळे त्यांना त्यांची गुणवत्ता कळाली असल्याचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले. यंदा दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, वाढीव गुणांमुळे विद्यार्थ्यांचे करिअर घडत नाही. केवळ दहावीला जास्त मार्क मिळाले आणि पास झाल्यानंतर मग अकरावी प्रवेश घ्यायचा. त्यानंतर पदवीधर होऊन बेरोजगारांच्या कारखान्यात दाखल व्हायचे. यापेक्षा दहावीच्या निकालात जर विद्यार्थ्याला त्याची गुणवत्ता कळली तर तो विद्यार्थी त्या पद्धतीचे करिअर निवडू शकतो, त्यातून त्याला चांगली संधी मिळू शकेल. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांना  आवाहन करत आहोत की, या निकालामुळे निराश होण्याचे कारण नाही. दहावीच्या निकालामधून विद्यार्थ्यांना आपल्या गुणवत्तेची दिशा आता कळली असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या दिशेला जाण्याचा प्रयत्न करा, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.