|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सूनची केरळात वर्दी

मान्सूनची केरळात वर्दी 

पुणे / प्रतिनिधी

दुष्काळात होरपळून निघालेल्या भारतीयांसाठी चांगली बातमी असून, नैत्य मोसमी वारे अर्थात मान्सून भारतीय भूमीतील प्रवेशद्वार समजल्या जाणाऱया केरळात शनिवारी दाखल झाला. दरम्यान, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, पुढील 48 तासांत तो केरळ व्यापेल तसेच पूर्वोत्तर भागातील राज्यात प्रवेश करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा 18 मेला मान्सून अंदमानात दाखल झाला. दरवर्षी 1 जूनच्या आसपास मान्सून केरळच्या भूमीवर दाखल होतो. यंदा मात्र तब्बल आठ दिवस उशिरा त्याने प्रवेश केला आहे. मागील वर्षी 29 मेच्या आसपास मान्सून केरळात सक्रिय झाला होता. पूर्वमोसमी पावसाचा अभाव तसेच गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यंदा दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अंदमानात मान्सून लवकर दाखल झाल्याने केरळात तो लवकर येण्याची आशा होती. मात्र,  हुलकावणी देत तब्बल आठवडाभर उशिराने त्याने केरळात प्रवेश केला आहे. दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीपचा काही भाग, दक्षिण तामिळनाडू, बंगालच्या उपसागराचा काही भाग, उत्तर पूर्व बंगालच्या भागात मान्सूनने प्रवेश केला आहे.

वाटचालीसाठी पोषक वातावरण

दरम्यान, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, पुढील 48 तासांत तो दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप केरळचा उर्वरित भाग, तामिळनाडूचा काही भाग, बंगालच्या उपसागर, मध्य अरबी समुद्र, पश्चिममध्य बंगालचा उपसागराच्या काही भागात प्रवेश करेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. याबरोबरच मान्सून पूर्वोत्तर भागातही प्रवेश करेल.

महाराष्ट्रात तीन दिवसांत

सर्वसाधारणपणे मान्सून तळकोकणात 7 जूनला येतो. यंदा त्याला उशीर झाल्याने तो 10 जूनच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास पाच ते सहा दिवसांचा अवधी लागू शकतो. पूर्वमोसमी पावसाने हुलकावणी दिल्याने यंदा राज्यात दुष्काळाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मान्सूनचे आगमन लांबल्याने बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. शेतीची कामेही लांबली असून त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.