|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काँग्रेस: एक उद्ध्वस्त धर्मशाळा

काँग्रेस: एक उद्ध्वस्त धर्मशाळा 

राहुल गांधी यांनी नादानपणा सोडून पक्षाची जबाबदारी ताबडतोब सांभाळावी अन्यथा अर्थाचा अनर्थ होईल, अशी कळकळ काँग्रेसी नेता आणि कार्यकर्ता व्यक्त करत आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल हे शौर्याने लढले खरे पण त्यांच्याकडे रणनीतीचा अभाव होता. लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱया दारुण पराभवामुळे काँग्रेसची अवस्था एखाद्या भग्न धर्मशाळेप्रमाणे होऊ लागली आहे.

घराचे वासे फिरले की कधी काय होईल ते कळत नाही. लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱया दारुण पराभवामुळे काँग्रेसची अवस्था एखाद्या भग्न धर्मशाळेप्रमाणे होऊ लागली आहे. ज्याच्यावर विसंबून पुढील लढाई लढायची त्या नेत्यानेच हातपाय गाळले तर कसे व्हायचे. राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद  सोडण्याचा लकडा पक्षाच्या मागे लावल्यापासून एकेकाळी वटवृक्षाप्रमाणे असणाऱया या पक्षाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे. ‘कोणत्याही परिस्थितीत मी राजीनाम्यावर ठाम आहे’ असा राहुलनी हट्टी मुलाप्रमाणे घोषा लावला आहे. त्यांच्या या ‘बालहट्टामुळे’ एकीकडे पक्ष हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे राज्याराज्यात सुंदोपसुंदी वाढली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आणि कोणी कोणाला विचारत नाही. आल्या संधीचा फायदा घेऊन पक्षांतर्गत विरोधकांचा काटा काढण्याचे काम सुरू आहे. केंद्रीय नेत्यांची बुजगावणी झाली आहेत. चाणाक्ष पाखरे उडून जाऊ लागली आहेत. हरियाणामध्ये पक्षाचे पानिपत झाल्याने वैतागलेल्या प्रदेशाध्यक्षाने ‘मुझे गोली मार दो’ असे आपल्या पक्षातील विरोधकांना सांगितले. तेलंगणात 18 पैकी 12 आमदारांनी पक्षाला राम राम ठोकला आणि ते सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीत जात आहेत. भोजनभाऊंची चांदी आहे तर सामान्य कार्यकर्त्याला कोणी विचारत नाही. गांधी घराण्याने ‘हाय कमांड कल्चर’ वाढवले आणि आता हाय कमांडमध्ये दम उरला नाही, तर बुडत्या जहाजातून उंदीर पलायन करतात तसे चित्र निर्माण होत आहे. महाराष्ट्रात माजी विरोधी पक्षनेतेच भाजपच्या मार्गावर रवाना झाले आहेत. काँग्रेसच्या 52 खासदारांपैकी काही सोडून जातील अशी भाकिते होत आहेत. भाजपच्या एका नेत्याच्या अनुसार ‘आम्ही थोडीशी खिडकी खोलली तर त्यातून घुसायचा प्रयत्न होत आहे. आम्ही जर दरवाजा खोलला तर विरोधी पक्षांचे काय होईल ही कल्पनाही करवत नाही. थोडक्मयात काय सगळा आनंदीआनंद आहे.

 काँग्रेसशासित राज्यांमध्ये यामुळे बेदिली माजली नसती तरच नवल होते. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी शेफारून ठेवलेले पंजाबचे मंत्री आणि माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू हे राज्यामध्ये घाण पसरवत आहेत. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग याच्यावर वचक ठेवण्यासाठी सिद्धूना प्रोत्साहन देण्यात आले होते. आता तेच श्रे÷ाrंकरता एक डोकेदुखी होऊन बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत अमरिंदर यांनी सिद्धूना प्रचारापासून दूर ठेवले होते. राज्यात मुख्यमंत्र्यांनी चांगले यश मिळवल्याने ते आता सिद्धूच्या मागे हात धुवून लागले आहेत. पंजाबमधील एकूण मंत्रिमंडळच सिद्धविरुद्ध उभे ठाकले आहे आणि अमरिंदर यांनी तर सिद्धू माझी खुर्ची घेऊ पाहत आहे असा जाहीर आरोप केला आहे. अमरिंदरना फार दुखावले तर ते वेगळी चूल मांडून प्रादेशिक पक्ष काढू शकतात अशी भीतीदेखील त्यांचे समर्थक वेळोवेळी दाखवतात. पंजाबमधील अकाली दलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. भाजपदेखील अकाली दलाची साथ सोडून स्वतंत्रपणे लढण्याचा विचार करत आहे. भाजपाला पंजाबमध्ये वाढण्यासाठी एका जाट शीख नेत्याची गरज आहे. ज्याचा शोध सुरू आहे. आतापर्यंत भाजप ही राज्यातील हिंदूंची पार्टी समजली जात होती.

 कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच काँग्रेसची नैय्या डुबवण्याच्या मागे लागले आहेत असा आरोप होत आहे. एकेकाळी देवेगौडा यांचे नंबर 2 असलेले सिद्धरामय्या आता त्यांचे नंबर 1 चे दुश्मन झाले आहेत. भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी निधर्मी जनता दलाला मुख्यमंत्रिपद देऊन काँग्रेस श्रे÷ाrंनी जी बाजी मारली ती तात्पुरती. तळागाळात या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन ना झाल्याने भाजपने 28 पैकी 25 जागा जिंकून कुमारस्वामी सरकारवर संकट आणले आहे. त्यात रोशन बेगसारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याला सत्तेबाहेर ठेवल्याने मुस्लिम समाजाने आता वेगळा राजकीय विचार करणे जरुरीचे आहे. भाजपाला शत्रू मानणे ठीक नाही असे आगळे तुणतुणे लावले
आहे. 

 राजस्थानमध्ये सत्ता येऊन सहा महिने झाले नाहीत तर मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वादंग वाढत आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 25 जागा काँग्रेस हरल्याने या आगीत तेल ओतले गेले आहे. गहलोत यांनी आपला मुलगा वैभवच्या पराभवाला पायलट याना जबाबदार धरून एक मोठा विनोदच केला आहे. जो मुख्यमंत्री आपल्या मुलाला जिंकून आणू शकत नाही त्याने राजीनामा दिलेला बरा असे गहलोत विरोधक म्हणत आहेत. पायलट हे अतिमहत्त्वाकांशी असल्याने पक्षापुढील संकट वाढले आहे.

 मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुल हा काँग्रेसचा एकमेव विजयी उमेदवार आहे. दिग्विजयसिंग यांचा 3.5 लाख मतांनी भोपाळमधून पराभव झाल्याने पक्ष हादरला आहे. तेथील सरकार फार काळ टिकणार नाही अशा बातम्या येत असतानाच कमलनाथ यांनी नकुलसह पंतप्रधानांची भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गहलोत काय अथवा कमलनाथ काय वा चिदंबरम काय, ते आपल्या मुलांचेच भले बघतात हा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत साक्षात राहुल गांधींनी केलेला आरोप पक्षाच्या सर्व स्तरावर लागू आहे. सोनिया गांधींनीदेखील आपल्या मुलाला पुढे आणल्यामुळेच राहुल हे पक्षाध्यक्ष झाले हे देखील सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

राहुल गांधी यांनी नादानपणा सोडून पक्षाची जबाबदारी ताबडतोब सांभाळावी अन्यथा अर्थाचा अनर्थ होईल, अशी कळकळ काँग्रेसी नेता आणि कार्यकर्ता व्यक्त करत आहे. लोकसभा निवडणुकीत राहुल हे शौर्याने लढले खरे पण त्यांच्याकडे रणनीतीचा अभाव होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा मुकाबला कसा करायचा याचे ज्ञान नसल्याने त्यांचा पराभव अटळ होता. आता झालेल्या चुका निस्तरायच्या कशा हे बघण्याला प्राधान्य दिले गेले नाही तर काँग्रेसची हालत अजून खराब होत जाईल हे सांगण्यास कोण्या कुडमुडय़ा ज्योतिषाची गरज नाही. 35 वर्षांपूर्वी भाजपालादेखील लोकसभा निवडणुकीत 543 पैकी अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या. त्या आता 300 पार झाल्या आहेत हे राहुलनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. स्मशान वैराग्य फार काळ टिकवून ठेवणे ना त्यांच्या फायद्याचे आहे ना पक्षाच्या.

सुनील गाताडे