|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कृष्णदयार्णव रचित हरिवरदा

कृष्णदयार्णव रचित हरिवरदा 

कृष्णदयार्णवाच्या हरिवरदा या ग्रंथात भक्तीच्या विवेचनाच्या ओघात तत्त्वज्ञानाचे निरूपणही सहजपणे येऊन गेले आहे. सरस्वती तर त्याच्या जिव्हाग्री नाचत होती. भाषा, तत्त्वज्ञान आणि काव्य या तीन्ही क्षेत्रातील त्याचे सामर्थ्य हरिवरदेत प्रकट झाले आहे. रासक्रीडेच्या वर्णनात कृष्णदयार्णवाने कामशास्त्राचा आपला व्यासंगही निदर्शनास आणला आहे. गृहस्थ जीवनात कामाचे धर्म्य स्थान मान्य करून, कामविषयक ज्ञानाची उपयुक्तता तो प्रतिपादितो. मात्र त्याचवेळी तो लोकांना एक सावधानतेचा इशाराही देऊन ठेवतो तो असा, की गोपीकृष्णांच्या नावाची ढाल पुढे करून स्वतःच्या विषयासक्तीचे पोषण करू नका.

आपण हे भागवताच्या दशम स्कंधाचे निरूपण प्रेमळ पण अव्युत्पन्न भक्तांच्या श्रवणसुखासाठी केले आहे. असे सांगून कृष्णदयार्णवाने शेवटी सर्व साधकांना व सिद्धांनाही पुढील संदेश दिला आहे-

अंतरिं असोनि निजात्मरत । बाह्य प्रवृत्ति कर्मासक्त ।

नाशों नेदितां परमार्थ । जनहितार्थ वर्तावें  ।

परमात्माच्या ठायी मनाची रती जडली आहे आणि ज्यांचा सर्व जीवनव्यापार त्याच्याच चिंतनाने भारावून गेला आहे, अशा भक्तांच्या उद्धारासाठी व योगक्षेमासाठी परमेश्वर कसा निजांग झटतो, त्याचे वर्णन कृष्णदयार्णव पुढीलप्रमाणे करतो-

ज्यांचीं माझ्या ठायीं मनें ।  मन मीनले जीवें प्राणें ।

मन्न÷िचि त्यांचीं करणें । विषयाचरणें मदथ ।

मद्गुणश्रवणीं शब्दग्रहण । मम मूर्तीचें आलिंगन ।

देव ब्राह्मण गुरु सज्जन । निवती पूर्ण त्या स्पर्शें  ।

मन्मय पाहती अखिल जग । नेणती गुणदोषाचें लिंग । कीर्तनसुधारसाचा भोग । जिव्हेसि चांग दाखविती ।

अथवा नामामृत रसपानें । जिव्हां सुरंग रंगली स्मरणें । कीं मत्प्रसादतीर्थ ग्रहणें । फावली रसने रसगोडी  ।

मदर्चनींच वेधले कर । मत्पर ज्यांचा पदव्यापार ।

मदर्थ करिती शौचाचार । अव्यभिचार मन्न÷ि ।

ऐसे जे कां सर्वांपरी । म्sाज कवळिती अभ्यंतरिं ।

त्यांची तैसीच मज अवसरी । मी संसारिं त्यांसाठीं  ।

त्यांचा योगक्षेम मी वाहें । मागें पुढें उभा राहें ।

त्यांचें विषम मज न साहे । मी लवलाहें तें निरसीं ।

त्यांची वाट झाडी हातें । कृपापीयूषें पोषीं त्यांतें ।

आपुले शिरिं त्यांचीं दुरितें । घेऊनि सरतें त्यां करिं ।

हरिवरदा हा ग्रंथ 42 हजार ओव्यांचा असून, हे एक आख्यान काव्य आहे. त्यात विदग्धता व आर्षता यांचा मधुर संगम झाला आहे. प्रकांड पांडित्याबरोबरच भाषा, व्यापक जीवनानुभूती व चिंतनशीलता हे गुणही कृष्णदयार्णवाच्या अंगी असल्यामुळे त्याच्या ग्रंथात हा संगम साधला आहे. त्याची भाषा संस्कृत प्रचुर व प्रगल्भ असूनही, तिच्यात जयदेवाच्या अष्टपद्यांसारखे संगीत आहे. भाषा, तत्त्वज्ञान आणि काव्य या तीन्ही क्षेत्रात याची प्रतिभा रसरसून प्रकट झाली आहे. या ग्रंथात वेदान्त आणि भक्ती यांचा सुंदर संगम झालेला दिसतो. त्याने कृष्णचरित्राच्या निमित्ताने परमार्थरंजित प्रपंचाचे व्यापक दर्शन घडविले आहे. त्यात नवरसांचे प्रवाहही खळाळून वाहत आहेत. ही सारी त्याला स्वप्नदृष्टांत देणाऱया एकनाथ महाराजांचीच कृपा होय.

Ad.  देवदत्त परुळेकर