|Saturday, October 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जुने ते सोने

जुने ते सोने 

जुने वाङ्मय वाचत असताना अनेक ठिकाणी अडखळायला होते. कारण त्या वेळचे सामाजिक जीवन, प्रचलित असलेले संकेत आपल्याला ठाऊक नसतात किंवा विसरलेले असतात. दोन मजेदार उदाहरणे आठवतात. एखादी गोष्ट आयती चालून आली किंवा शत्रूवर मात करण्याची संधी अनपेक्षितरित्या लाभली तर पूर्वी ‘ससा भाणवशात आला’ असे म्हणत. या वाक्प्रचाराचा अर्थ झटकन लागत नाही. ससा म्हणजे हवी असलेली संधी हे लक्षात घेऊन त्याची चिरफाड केली की अर्थ उलगडतो. पूर्वी शेताजवळ किंवा शेतात बांधलेल्या घरांमध्ये सरपणावर चालणाऱया चुली असत. स्त्रिया खाली बसून स्वयंपाक करीत. चुलीमागे असलेल्या ओटय़ावर सतत लागणारी भांडीकुंडी असत, जेणेकरून स्वयंपाक करताना एखादे भांडे हवे असेल तर महिला जागेवरून न उठता ते भांडे घेऊ शके. चुलीमागच्या ओटय़ाला भाणवस म्हणतात. हिवाळय़ात सायंकाळी स्वयंपाक आणि जेवणं झाली की झाकपाक उरकून कुटुंबे झोपी जात. पहाटे बाहेर सर्वत्र गारवा असे. मात्र चुलीमागचा ओटा (भाणवस) किंचित उष्ण-ऊबदार असे. अशात एखादा ससा उबेसाठी म्हणून घरात शिरला तर थेट भाणवशात जाऊन गाढ निजे. सकाळी गृहिणीला तो आयता सापडे. त्यावरून ‘ससा भाणवशात आला’ हा वाक्प्रचार रूढ झाला.

पूर्वी अनेक घरात विडय़ाची शौकिन मंडळी असत. त्यांच्याकडे विडय़ाची पाने, सुपारी, कात, बडीशेप वगैरे ठेवण्यासाठी पितळी डबा (पानदान) असे. या डब्यातली सुपारी अख्खी असे. विडा जमवताना अडकित्त्याने सुपारीचे टवके काढून विडय़ात वापरले जात. अडकित्त्याचे एक पाख चपटे आणि दुसरे धारदार असे. त्यात सुपारी ठेवून अडकित्ता दाबला की सुपारीचा बारीकसा टवका निघे. ‘अडकित्त्यात सापडणे’ म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे हा अर्थ यावरूनच रूढ झाला असणार.

‘अटकेपार झेंडे लावणे’ याचा अर्थ जुन्या पिढीतील कोणाही मराठी माणसाला उलगडून सांगायची गरजच नाही. पेशवाईच्या अमदानीत माधवराव पेशव्यांचे काका रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा ऊर्फ राघोभरारी यांनी अटकेवर स्वारी करून तिथे भगवा फडकावला होता. अटक हे गाव पंजाबमधले. फाळणीनंतर पंजाबचा हा भाग पाकिस्तानमध्ये गेला. पण आजही कोणी फार मोठा पराक्रम गाजवला तर ‘अटकेपार झेंडा लावला’ अशा शब्दात त्याचे कौतुक करण्याची प्रथा आहे.