|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱयाची आत्महत्या

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱयाची आत्महत्या 

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यत

प्रतिनिधी / मालवण:

 शहरातील फोवकांडा पिंपळनजीकचे रहिवासी व सेवानिवृत्त एसटी चालक पंकज तुकाराम माणगावकर (67) यांनी घरामागील पेऊच़्या झाडास गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

  पंकज माणगावकर हे सेवानिवृत्त एसटी चालक होते. ते अविवाहित होते. शनिवारी रात्री ते जेवण आटोपून झोपी गेले. सकाळी ते घरात कोठेही न दिसल्याने त्यांच्या वहिनीने त्यांचा शोध घेतला असता घरामागील पेरुच्या झाडास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. माणगावकर यांनी पायाखाली प्लास्टिकची बादली ठेवून गळफास घेतल्याचे दिसून आले. वहिनीने ही माहिती तात्काळ उमेश शिरोडकर यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक यतीन खोत, महेंद्र म्हाडगूत, संजय भोगवेकर, प्रसाद परुळेकर, अवधूत परुळेकर, विनायक खोत, सदा चुरी यांच्यासह अन्य स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, राजू वराडकर, दीपक पाटकर, मोहन वराडकर, उमेश नेरुरकर, जगदीश नेवाळकर यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलीस उशिराने दाखल

  आत्महत्येची माहिती पोलिसांत देण्यात आली होती. मात्र, पोलीस यंत्रणा उशिराने घटनास्थळी दाखल झाली. यामुळे उपस्थित नागरिकांतून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत होती. पोलीस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर, सुनील पवार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पंकज यांचा भाऊ बाहेरगावी गेला होता. त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, वहिनी, भाचे, भाची असा परिवार आहे. माजी आमदार कै. श्यामराव कोचरेकर यांचे ते आत्येभाऊ होत. माणगावकर यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होऊ शकलेले नव्हते.