|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सरगवेच्या सुपुत्राचे ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी नामांकन

सरगवेच्या सुपुत्राचे ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी नामांकन 

अजय सावंत यांची ‘घोडेस्वारीत’ सोनेरी कामगिरी : सलग तीन वर्षे होतेय नामांकन

तेजस देसाई / दोडामार्ग:

  शासनपातळीवरील अत्यंत महत्वाचा पुरस्कार मानला जाणाऱया ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी दोडामार्ग तालुक्यातील सरगवे पुनर्वसन गावचे सुपुत्र अजय अनंत सावंत यांचे मानांकन झाले आहे. श्री. सावंत हे भारतीय सैन्य दलात 61 पॅवलरी या तुकडीत सुभेदार पदावर आहेत. घोडेस्वारी या खेळात त्यांनी जगात उल्लेखनीय कामगिरी केली असून याच क्रीडा प्रकारातून अधिकाऱयांनी त्यांना तसे शिफारसपत्र दिले आहे. महत्वाचे म्हणजे सलग तिसऱया वर्षी त्यांचे नामांकन झाले असून थोडक्यात संधी हुकत आहे. यावर्षी त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्यास सिंधुदुर्गच पर्यायाने कोकण व महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल होणार आहे.

  विविध प्रकारच्या खेळात प्रतिवर्षी सर्वोत्कृष्ट ठरणाऱया भारतीय खेळाडुंना देण्यात येणारा हा राष्ट्रीय पुरस्कार. पुरस्कार देण्याची प्रथा भारत सरकारने 1961 पासून सुरू केली. भारतातील क्रीडाप्रकार व खेळ यांच्या विकासास उत्तेजन देणे, हा या पुरस्कारामागील उद्देश आहे. ‘ऑल इंडिया कौन्सिल ऑफ स्पोर्टस’ (ए.आय.सी.एस.) व भारत सरकारचे शिक्षण-मंत्रालय यांनी मान्यता दिलेल्या राष्ट्रीय संघटनांकडून प्रतिवर्षी अर्जुन पुरस्कारासाठी प्रवेश-अर्ज मागविण्यात येतात. ‘ए.आय.सी. एस.’ ची स्थायी समिती आलेल्या प्रवेशांची छाननी करते व त्यातून खेळाडुंची निवड करून त्यांची शिफारस ‘ए.आय.सी.एस.’ कडे करते. नंतर ‘ए.आय.सी.एस.’ कडून या निवडीची फेरतपासणी होऊन पुरस्कृत खेळाडूंची नावे भारत सरकारकडे पाठविली जातात. ‘ए.आय.सी.एस.’ च्या शिफारशींशिवायही सरकार स्वतःच्या निकषांवर एखाद्या खेळाडूस पुरस्कार देऊ शकते. एखाद्या वर्षाच्या पुरस्कारासाठी खेळाडूची निवड करताना, त्याच्या त्या वर्षाच्या सर्वोत्कृष्ट प्राविण्याबरोबरच, तत्पूर्वीच्या तीन वर्षांतील राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याचे क्रीडा-नैपुण्यही विचारात घेतले जाते. एकाच खेळाडूस हा पुरस्कार दोनदा दिला जात नाही. हा पुरस्कार पदक व शिफारसपत्र या स्वरुपात असतो. या पुरस्कारात रोख रकमेचा व विशेषाधिकारांचा समावेश नसतो. पदक ब्राँझचे असून ते मत्स्यवेध करणाऱया धनुर्धारी अर्जुनाच्या शिल्पाकृतीचे असते. शिफारसपत्रामध्ये अर्जुनाचे चित्र व इंग्रजी-हिंदी भाषांतून खेळाडूचे नाव, क्रीडाप्रकार व वर्ष यांचा निर्देश असतो. या शिफारसपत्राच्या वरील बाजूस भारत सरकारचे बोधचिन्ह व खालील बाजूस शिक्षण मंत्रालयाच्या सचिवाची स्वाक्षरी असते.

सावंत यांचे घोडेस्वारीत तब्बल 13 वेळा सोनेरी कामगिरी

   सावंत यांनी सैन्यदलात सुभेदार म्हणून काम करीत असताना एका अवघड समजल्या जाणाऱया ‘घोडेस्वारी’ या खेळात विशेष ओळख निर्माण केली आहे. श्री. सावंत यांनी आजपर्यंतच्या खेळात भारत व भारताबाहेर अशा ठिकाणी तब्बल 156 पदक मिळविली आहेत. यातील काही निवडक 2015 पासून ते 2019 पर्यंतची कामगिरी अशी आहे. 25 फेब्रुवारी 2015 दिल्ली नोयेडा एशियन इंटरनॅशल व नॅशनल (चार गोल्ड, तीन सिल्व्हर, दोन ब्रॉन्झ), 9 डिसेंबर 2015 वर्ल्ड कप क्वालीफाय राऊंड डुबई आबूधाबी (तीन गोल्ड, दोन सिल्व्हर), 11 एप्रिल 2016 दुसरे वर्ल्ड कप इजिप्त (तीन गोल्ड), 20 नोव्हेंबर 2017 भारत नॅशनल गेम (2 सिल्व्हर, 2 ब्रॉन्झ या गेमवरून तिसऱया वर्ल्ड कपसाठी निवड), 3 जाने 2018 वर्ल्ड कप क्वालीफाय राऊंड ऑस्ट्रेलिया (दोन गोल्ड, दोन  सिल्व्हर, एक ब्रॉन्झ), 30 ऑक्टोबर 2018 व 2 नोव्हेंबर तिसरे वर्ल्डकप आबुधाबी यू. ए. ई. ( 1 सिल्व्हर) 10 डिसेबर नॅशनल गेम 2018 ( एक गोल्ड, सिल्व्हर) अशी पदकांची कमाई केली. आर्मीच्यावतीने याच त्यांच्या कामगिरीवर सहा पदक देऊन गौरव केला आहे. स्वतः घोडेस्वारीत नावलौकीक मिळविणाऱया श्री. सावंत यांनी अद्यापपर्यंत घोडेस्वार खेळात सुमारे 10 हजार 500 विद्यार्थ्यांना एन. डी. ए. खडकवासला पुणे येथे प्रशिक्षण दिले आहे.

कामगिरी करतच राहू – सावंत

  याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सावंत म्हणाले, यापूर्वी सलग तीन वेळा आपले अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन होणे हीच गौरवाची बाब आहे. आपल्या भागातील अनेकांनी खेळातून पुढे आले पाहिजे. आपणाला पुरस्कार मिळाल्यास आनंद आहेच. पण, देशाच्या नावलौकीकासाठी माझे खेळ व सुभेदार म्हणून कर्तव्य मी प्रामाणिकपणे पार पाडत राहीन, असे यावेळी सावंत म्हणाले.