|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दृष्ट प्रवृत्तीला ठेचून गाढावेच लागेल!

दृष्ट प्रवृत्तीला ठेचून गाढावेच लागेल! 

खासदार राऊत यांचा दोडामार्गात घणाघात

निवडून येण्यासाठी काम करावे लागते!

दोडामार्गात शिवसेनेचा ‘कृतज्ञता’ मेळावा

प्रतिनिधी / दोडामार्ग:

आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणुकीत मते मागितली. पण, विरोधकांनी राजकारणातील ‘नीच वृत्ती’ दाखविली. पण, कोकणवासीयांनी ही ‘विकृती’ कायमची गाडली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांना आमिषे दाखविण्यात आली. मात्र, प्रलोभनांना बळी पडणारा शिवसेना-भाजपचा कार्यकर्ता नाही, हे या निवडणुकीने दाखविली. आता सगळं प्रेमाने जिंकता येणार नाही. दृष्ट आहे त्याला ठेचून काढलेच पाहिजे व सज्जनाच्या पाठीशी राहून त्याला आधार दिला पाहिजे. तरच सगळं व्यवस्थित होईल, अशी घणाघाती टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. शिवाय विरोधक आपला विजय होईल, अशा गमजा मारत होते. मात्र, त्यासाठी काम करावे लागते. विश्वास निर्माण करावा लागतो, असा सल्लाही राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

शिवसेनेच्या लोकसभेतील मोठय़ा विजयानंतर दोडामार्ग दौऱयावर खासदार राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर रविवारी होते. त्यावेळी आयोजित केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. सुरुवातीला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात जात तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. तेथून ते रॅलीत सहभागी झाले. दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय ते महालक्ष्मी सभागृह अशी पायी रॅली झाली. बाजारपेठेतील पिंपळेश्वर देवस्थानच्या चरणीही श्री. राउढत व श्री. केसरकर लीन झाले. त्यानंतर महालक्ष्मी सभागृहात ‘कृतज्ञता मेळावा’ झाला.

यावेळी श्री. राउढत व श्री. केसरकर यांच्यासमवेत शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, माजी आमदार राजन तेली, विधानसभा संपर्कप्रमुख विक्रांत सावंत, जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, संपदा देसाई, उपसभापती बाळा नाईक, माजी सभापती गणपत नाईक, माजी उपसभापती धनश्री गवस, नगराध्यक्ष लीना कुबल, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, तालुका संघटक संजय गवस, उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हासंघटक गोपाळ गवस, जान्हवी सावंत, ऍड. नीता कविटकर, लक्ष्मण गुळ्ळेकर, संतोष मोर्ये, चंदन गावकर, विजय जाधव, भगवान गवस, भिवा गवस, रंगनाथ गवस, आनंद रेडकर, मदन राणे, नगरसेवक संतोष म्हावळणकर, दिवाकर गवस आदींसह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जि. प. सदस्य राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन गोपाळ गवस यांनी केले.

आता रोजगारासाठी प्रयत्न करणार!

 राऊत पुढे म्हणाले, या निवडणुकीने रक्तरंजित इतिहासही पुसून काढला आहे. आता रोजगारासाठी प्रयत्न होणार आहे. आडाळी एमआयडीसीसह मुख्य उद्योग व सहरोजगाराभिमुख उद्योग आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे. यापूर्वीच रोजगार येणार असते. मात्र, रोजगार यायच्या आत त्यांच्याकडे 50 टक्के हिस्सा मागितला जायचा. त्यामुळे ते घाबरायचे. आता ही भीती दूर झाली आहे. आपले रोजगार निर्मिती हेच प्रमुख उद्दिष्ट असल्याचे राऊत म्हणाले

हत्ती पर्यटनाचा विषय बनेल!

दोडामार्गात सध्या सुरू असलेल्या हत्ती उपद्रवावर खासदार राऊत म्हणाले, तिलारी परिसरात हत्तींसाठी ‘कन्झर्मेशन एरिया’, संरक्षित क्षेत्र बनविण्याचा विचार असून ‘एलिफंट पॅरिडॉर’ झाल्यास पर्यटन बहरणार आहे. तिलारीला ‘पर्यटन हब’ बनविण्यात येणार असून हत्तीही पर्यटनाचा विषय बनणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राऊत यांनी ठेकेदारांवरही टीका केली.

विधानसभा जागांचा निर्णय वरिष्ठांकडे!

आपण आयुष्यात स्वार्थ बघितला नाही. हा मतदार संघ भाजपला सोडणे, उमेदवार कोण देणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वरिष्ठांचा विषय आहे. मात्र, मला उमेदवारी मिळो न मिळो, आपण प्रामाणिकपणे शिवसेनेने दिलेल्या उमेदवाराचेच काम करणार. हा जिल्हा घडविण्यासाठी शिवसेना-भाजप एकत्र राहणे महत्वाचे आहे, असे आपणाला वाटते.