|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बंदर जेटी, टर्मिनल इमारतीचे काम प्रगतीपथावर

बंदर जेटी, टर्मिनल इमारतीचे काम प्रगतीपथावर 

50 टक्के काम पूर्ण : 8 ते 10 महिन्यात प्रवासी जेटी होणार खुली

प्रतिनिधी / मालवण:

मालवण बंदर जेटी येथे नव्याने उभारणी होत असलेल्या प्रवासी जेटी व टर्मिनल उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. जेटीच्या किनाऱयापासून समुद्रातील 20 पैकी 18 पिलरचे तसेच टर्मिनल इमारत उभारणीचे कामही पूर्ण झाले आहे. दरम्यान, पावसाळा कालावधीतही काम सुरू राहणार असून 8 ते 10 महिन्यात दर्जेदार जेटी प्रवासी वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल, असा विश्वास बंदर विभागाच्या अभियंत्यांनी व्यक्त केला आहे.

मालवण बंदर येथील जुन्या जेटीवर किल्ले सिंधुदुर्ग होडी प्रवासी वाहतुकी दरम्यान ओहोटीवेळी कमी पाण्यामुळे होडय़ा उभ्या करताना समस्या निर्माण होत होती. पर्यटक प्रवाशांना थांबावे लागत होते. होडी व्यवसायिकांना या समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागत होते. त्यामुळे यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून जुन्या जेटीला समांतर अशी जास्त लांबीची नवी जेटी शासनाने मंजूर केली.

58 मीटर लांब व साडेसात मीटर रुंद अशा सुमारे पाच कोटी खर्चाच्या जेटी उभारणीसोबत प्रवासी व पर्यटकांना बैठक व निवारा व्यवस्था तसेच कॅन्टिन,
प्रसाधनगृह असलेली कोटय़वधी रुपये खर्चाची टर्मिनल इमारतही मंजूर झाली. मात्र, पर्यावरण विभागाच्या सीआरझेड परवानगीमुळे कामास विलंब झाला होता. मात्र, आमदार वैभव नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर तसेच बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून केंद्रीय पर्यावरण विभागाची परवानगी मिळाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी या जेटी व टर्मिनलचे काम सुरू झाले आहे.

समुद्रात 58 मीटर लांब जेटी

बंदर विभागाच्या मालवण कार्यालयासमोर जेटी व टर्मिनल उभारणीचे काम सुरू आहे. किनाऱयापासून समुद्रात 58 मीटर लांब ही जेटी असणार आहे. सुरुवातीला मोठय़ा काळय़ा दगडांची उभारणी, त्यावर टर्मिनल इमारत अन् त्यापुढे समुद्रात 20 पिलर (पाईन) उभारणी होत असून त्यावर जेटी बांधकाम सुरू आहे. 7.55 मीटर रुंद आलेल्या जेटीच्या शेवटी दोन्ही बाजूस पायऱया असून प्रवाशांना होडीत चढण्या व उतरण्यासाठी त्यांचा वापर होणार आहे.

नव्या पर्यटन हंगामात जेटी प्रवाशांच्या सेवेत

नव्या पर्यटन हंगामाच्या मार्च, एप्रिल महिन्यात जेटीचे काम व टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण करून जेटी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. एक उत्तम व दर्जेदार जेटी उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे बंदर विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.