|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » खेड, चिपळुणात पावसाची दमदार सलामी

खेड, चिपळुणात पावसाची दमदार सलामी 

रत्नागिरी

गेल्या 2 दिवसांपासून तापमानाचा पारा 31 डिग्री सेल्सियसवर आला आहे. उष्णता कमी झाली असली तरी उकाडय़ामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या उकाडय़ाने नागरिक त्रस्त झाले आहेत. येत्या 24 तासात कधीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून रविवारी दिवसभर रत्नागिरीत ढगाळ वातावरण निर्मिती होऊन पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. दरम्यान रविवारी खेड आणि चिपळुणात पावसाने दमदार सलामी दिल्याने उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे. वादळी वाऱयासह आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. दिवसभर सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरूच होता.

गेले 15 दिवस नागरिक पावसाची आतूरतेने वाट पाहत आहेत. हवामान विभागाने गेल्या आठवडय़ात यावेळी 15 दिवस उशीरा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आता येत्या 24 तासात काही प्रमाणात पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. उकाडय़ाने त्रस्त झालेले नागरिक आता पाऊस कधी पडेल, या आशेवर आहेत.

दुसरीकडे पाऊस पडला नसल्याने यंदा पाणी टंचाईची भीषण समस्या जिल्हय़ात उद्भभवली असून कधी नव्हे तर एमआयडीसीकडे पाणीसाठा शिल्लक नाही. एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस पडल्याशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही, असे एमआयडीसीचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हीच परिस्थिती नगर परिषदेचीही आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री काही प्रमाणात रिपझिप पाऊस काही भागात पडला. मात्र खऱया अर्थाने जो पाऊस पडणे अपेक्षित आहे तसा अद्यापही पडलेला नाही. केरळला पाऊस दाखल झाला असून आता कोकणातही येत्या 24 तास पाऊस पडेल, असे हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिसून येत आहे.                               खेडमध्ये पावसाची दमदार सलामी

पावसाने रविवारपासून विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह सलामी देत चौफेर  बरसण्यास सुरूवात केली. सकाळी 7 वाजता अर्धा तास व सायंकाळी 5.45 वाजल्यानंतर तुफानी पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजा सुखावला आहे.

  3 दिवसापूर्वी पावसाच्या हलक्या सरी पडल्या होत्या. त्यानंतर शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली होती. रविवारी सकाळी अर्धा तास पाऊस पडल्यानंतर सायंकाळपर्यंत उसंत घेतली होती. परिणामी उकाडय़ात भर पडली होती. उष्म्याने हैराण झालेले नागरिक सायंकाळी उशिरा पडलेल्या पावसामुळे वातावरणातील गारवा अनुभवू लागले. काळय़ाकुट्ट ढगांनी शहरासह ग्रामीण भाग व्यापून जावून अंधार निर्माण झाला. ढगांचा गडगडाट व वीजांच्या लखलखाटासह पावसाने जोरदार सलामी दिल्याने रस्त्यांसह गटारे-नाल्यांतून पाणी भरून वाहत होते. पावसाने सुरूवात केल्याने बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता, तर शहरातील रस्त्यांवर वाहने व पादचारीही कमी झाले. सायंकाळी शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

चिपळूणला पावसाने झोडपले

गेल्या 3 दिवसांपासून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. वादळी वाऱयासह आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. दिवसभर सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरूच होता.

गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात मोठी वाढ झाली असून सर्वजण हैराण झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारपासून अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे काहींचा दिलासा मिळाला. शनिवारी रात्री सर्वत्र जोरदार पाऊस पडला. त्यामुळे रविवारी सकाळी ढगाळ वातावरण होते. मात्र त्यानंतर कडाक्याचे ऊन पडले. मात्र सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण होऊन अर्धा तास वादळी वाऱयासह जोरदार पाऊस पडला. यामुळे वीज मात्र गायब झाली होती. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेने शहरातील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला आहे. एवढेच नव्हेतर सातत्याने कारवाई सुरू ठेवली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना पावसाळय़ासाठी छप्परे उभारता येत नाहीत. यामुळे पाऊस येताच त्यांची तारांबळ उडत आहे.