|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » मान्सूनने लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग व्यापला

मान्सूनने लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग व्यापला 

कर्नाटकात कोणत्याही क्षणी धडकण्याची शक्यता, अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती

पुणे / प्रतिनिधी

भारतीय भूमीत दाखल झाल्यानंतर मान्सूनचा प्रवास दमदार सुरू झाला असून, त्याने सोमवारी लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा काही भाग, तामिळनाडूचा काही भाग, मिझारोम व मणीपूरच्या काही भागात प्रवेश केल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. परिणामी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पुढील तीन दिवस वादळी वाऱयासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अरबी समुद्र, लक्षद्वीप, केरळ, कर्नाटकातील मच्छीमारांना 10 व 11 जूनला, महाराष्ट्र किनारपट्टीवर 11 व 12 जूनला, गुजरात व कच्छ किनारपट्टीवर मच्छीमारांना 12 व 13 जूनला समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

8 जूनला केरळात दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास सुरू झाला असून, त्याने सोमवारी केरळचा बहुतांश भाग व्यापला. तसेच तामिळनाडूच्या आणखी भागात मुसंडी मारली आहे. याशिवाय अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराच्या आणखी भागात त्याने आघाडी घेतली आहे. मान्सूनने पूर्वोत्तर राज्यातही प्रवेश केला असून, मिझोराम, मणीपूरच्या काही भागात तो पसरला आहे. मान्सूनची अशीच घोडदौड कायम राहिल्यास तो दोन ते तीन दिवसांत तळकोकणात पोहोचण्याची आशा आहे.

पूर्वमोसमी पावसाचा तडाखा

दरम्यान, कर्नाटक, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत पूर्वमोसमी पावसाने तडाखा दिला आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन सायंकाळी सोसाटय़ाच्या वाऱयासह धो धो पाऊस पडत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळसदृश्य परिस्थितीनेही पावसाला हातभार लावला आहे.

 अरबी समुद्रात चक्रीवादळ

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल, हे वादळ भारतीय किनारपट्टीपासून दूर जाणार असले तरी त्याच्या प्रभावाने पश्चिम किनारपट्टीवर पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

राजस्थान, विदर्भात ‘हिट वेव्ह’

दरम्यान, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरियाणा व उत्तर प्रदेशच्या भागात सुरु असलेली उष्णतेची लाट पुढील 2 दिवस कायम राहणार आहे. सोमवारी राजस्थानातील गंगानगर येथे सर्वाधिक 48.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.