|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » निरीक्षण गृहातून चार मुलींचे पलायन

निरीक्षण गृहातून चार मुलींचे पलायन 

सुंदरबाई मालू निरीक्षण गृहातील प्रकार : विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार : मुलींचा शोध सुरु

प्रतिनिधी/ सांगली

येथील सांगली-मिरज रस्त्यावरील पुष्पराज चौकाजवळ असणाऱया सुंदरबाई शंकरलाल मालू मुलींच्या निरीक्षण गृहातील चार मुलींनी पलायन केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत निरीक्षणगृहाच्या प्रभारी अधीक्षक स्वाती पाटील यांनी विश्रामबाग पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान येथील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, उद्यान तसेच परिसरात मुलींचा शोघ घेतला, मात्र त्या सापडल्या नाहीत अशी माहिती पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, की सांगली-मिरज रस्त्यावर पुष्पराज चौकाजवळ संदरबाई शंकरलाल मालू मुलींचे निरीक्षण सुधारगृह आहे. या निरीक्षण गृहात दहा मुली होत्या. दुपारी जेवण झाल्यानंतर निरीक्षणगृहात काम करणाऱया मावशी काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. तर अधीक्षक स्वाती पाटील यांच्यासह अन्य कर्मचारी कार्यालयातच होते. त्यावेळी लक्ष ठेवण्यास कोणीच नसल्याचा फायदा उठवत चार मुलींनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकवटून पलायन केले. सुभाषनगर (मिरज), सांगलीवाडी, निमणी, पलूस येथील या मुली होत्या.  मुली बेपत्ता झाल्याचे कळताच प्रभारी अधीक्षक स्वाती पाटील यांच्यासह कर्मचाऱयांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

 या घटनेची माहिती मिळताच काही मुलींच्या पालक सुधारगृहात आले. त्यांनी  याबाबत प्रभार अधीक्षक पाटील यांच्याकडे याबाबत चौकशी करत पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची मागणी केली. त्यानंतर अधीक्षक पाटील यांनी याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथके तयार करुन पलायन केलेल्या मुलींचा शोध सुरु केला. शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड, उद्याने आदी परिसरात मुलींचा शोध घेण्यात आला. मात्र त्या सापडल्या  नाहीत. दरम्यान, एका मुलीच्या घरी जात अधिक्षक पाटील यांच्यासह कर्मचाऱयांनी चौकशी केली असता, त्या अर्ध्यातासापूर्वी कपडे घरातून कपडे घेवून गेल्याचे शेजाऱयांनी सांगितल्याचे स्वाती पाटील यांनी सांगितले. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून सुधारगृहातून मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी काही मुलांनी सुधारगृहातून पलायन केले होते.

निरीक्षण गृहात सुरक्षेचा बोजवारा

निरीक्षण गृहात मुलींच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका महिला पोलीस कर्मचाऱयाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र ही महिला कर्मचारी रजेवर होती. तिच्या बदली पोलिस ठाण्यातून कोणीही देण्यात आले नव्हते. याचा फायदा उठवत मुलींनी पलायन केले. दरम्यान, याबाबत पोलिसांना पत्र पाठवणार असल्याचे स्वाती पाटील यांनी सांगितले.

 

Related posts: