|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मावस भावाच्या खूनप्रकरणी आरगच्या युवकास जन्मठेप

मावस भावाच्या खूनप्रकरणी आरगच्या युवकास जन्मठेप 

प्रतिनिधी/ सांगली

शेतजमीन, घर व आजोबांच्या पेन्शनच्या वाटणीवरुन मावस भाऊ हर्षल कांबळे याचा डोक्यात दगड घालून खून केल्याप्रकरणी आगरच्या युवकास जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा दीक्षित यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शशिकांत रमेश भोसले (वय 35 रा. आरग, ता. मिरज) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. 26 एप्रिल 2016 रोजी आरग येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील श्रीमती आरती देशपांडे-साटविलकर यांनी अंतिम युक्तीवाद केला. 

खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मयत हर्षल कांबळे व आरोपी हे नात्याने मावस भाऊ होते. हर्षल याच्या आजोबांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी शशिकांत हा त्याच्या घरी जात आजोबांच्या नावावर असलेली शेतजमीन, घर व पेन्शनमध्ये वाटणी मागत होता. त्यासाठी तो वेळोवेळी हर्षलबरोबर भांडणही करत होता. शशिकांतला दारुचे व्यसन असल्याने त्याच्या आजीने ‘तू जोपर्यंत सुधारणार नाहीस, तोपर्यंत वाटणी देणार नाही’, असे त्याला ठणकावून सांगितले होते. त्यामुळे शशिकांत आजी व मावस भाऊ हर्षलवर चिडून होता.

हर्षलच आजीला वाटणी न देण्यास शिकवत असावा असा त्याचा संशय होता. त्यामुळे तो त्याच्यासह कुटुंबाशी फटकून वागायचा. घटनेपूर्वी चार ते पाच दिवस आधी शशिकांतची मुले हर्षलच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी हर्षल व आजी घरातील फरशी साफ करत होते. त्यावेळी हर्षल शशिकांतच्या मुलावर रागावला. मुलांनी हा प्रकार त्याच्या कानावर घातला. शशिकांतने याचा जाब विचारताच दोघांमध्ये बाचाबाची झाला. दरम्यान, 25 एप्रिल रोजी हर्षल त्याच्या घरासमोर ओटय़ावर झोपला होता. त्यावेळी शशिकांत तिथे आला. त्याने एक दगड हर्षलच्या डोक्यात घातला. दगडाचा आघात होताच हर्षल जोरात ओरडला. त्यानंतर घरातील सर्वजण बाहेर आले, त्यावेळी शशिकांत हर्षलच्या डोक्याजवळ उभा होता.

त्यांनतर तो घटनास्थळावरुन पळून गेला. हर्षलच्या नाका-तोंडातून रक्त येत असल्याने त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शशिकांतच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सचंद श्रीकांत कांबळे याने फिर्याद दिली होती. पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी या गुह्याचा सखोल तपास करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारपक्षातर्फे 12 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी सचंद कांबळे, पंच साक्षीदार, वैद्यकिय अधिकारी, तपास अधिकारी यांचे साक्षी, पुरावे ग्राह्य धरुन आरोपी शशिकांत याला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली.