|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पोलीस हवालदारास मारहाण प्रकरणी तिघांना अटक

पोलीस हवालदारास मारहाण प्रकरणी तिघांना अटक 

प्रतिनिधी/ मिरज

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या नारायण माणिकराव डवरे यांना धक्काबुक्की करत मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कळंबी (ता. मिरज) येथील तिघांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. रविवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास मिरज-पंढरपूर रोडवर सिध्देवाडी खणीजवळ हा प्रकार घडला. न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी दिली आहे.

पोलीस हवालदार यास मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये श्रीकांत पवार आणि त्याची दोन मुले युशांत आणि सुरज (तिघेही रा. कळंबी) यांचा समावेश आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, हवालदार नारायण डवरे हे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. रविवारी सकाळी ते कवठेमहांकाळहून विश्रामबाग सांगलीडे येत होते. मिरज-पंढरपूर रोडवर कळंबी गावचे हद्दीत सिध्देवाडी फाटय़ाजवळ आले असता, त्यांना रस्त्यावर लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ते जीपमधून उतरुन गर्दीच्या ठिकाणी गेले असता, तेथे सतीश भीमराव कुमठळे या जीप (एमएच-10-के-993) चालकास युशांत, सूरज आणि श्रीकांत पवार हे मारहाण करुन जीपच्या बाहेर ओढत होते.

यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जीप चालकाचे संरक्षण व्हावे, म्हणून हवालदार डवरे यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केला. यावेळी त्यांनी मारहाण करणाऱयांना आपण पोलीस असल्याचे सांगत जीप चालकाविरुध्द काही तक्रार असल्यास ती पोलीस ठाण्यात द्यावी, असे समजावून सांगत असताना, ‘तू कुठला कोण?, तुझा काय संबंध?’ असे म्हणत जीप चालकास पुन्हा मारहाण करु लागले. त्यास अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी नारायण डवरे यांनाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी करत शासकीय कामात अडथळा आणला. तशी फिर्यादी ग्रामीण पोलिसात दिल्याने तिघांनाही अटक झाली आहे.

Related posts: