|Wednesday, September 18, 2019

 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

अनियमित पाणीपुरवठा व गैरव्यवस्थापन यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱया रत्नागिरी शहरवासीयांना आता पाण्याची आणखीनच काटकसर करावी लागणार आहे. पाऊस लांबला असतानाच शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ धरणातील पाणीसाठा 16 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे  शहरात एक दिवसा आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने घेतला आहे.

   शहराच्या पाणीपुरवठय़ासंदर्भात नगर परिषदेतील शिवसेना-भाजप नगरसेवक व अधिकाऱयांची संयुक्त बैठकीत हा निर्णय घेतल्याचे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंडय़ा साळवी यांनी सांगितले. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱया शीळ धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही नादुरूस्त झालेल्या जलवाहिनीमुळे पाणी-पाणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यातच तीव्र उन्हाळय़ामुळे धरणातील पाणीसाठय़ावर मर्यादा आल्या आहेत.  एमआयडीसीकडून होणाऱया पाणीपुरवठय़ात याआधीच दोनदा कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता नगर परिषदेनेही दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला आहे.

  शीळच्या जलवाहिनीला मोठय़ा प्रमाणत गळती असल्याने पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम झाला आहे. शहरातील साठवण टाक्याही पूर्णपणे भरताना दिसून येत नाहीत. त्यातच लांबलेला पाऊस व धरणात असलेला केवळ 16 टक्के पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात बुधवारपासून एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात दोन टप्प्यात होणार पाणीपुरवठा

   पाणीपुरवठा करताना शहराचे साळवी स्टॉप ते माळनाका आणि माळनाका ते शहर खालचा भाग असे दोन भागात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार दोन भागांना एक दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. बुधवारी माळनाका ते खालचा भाग या ठिकाणी तर गुरूवारी खालच्या भागाचा पाणी पुरवठा बंद ठेऊन साळवी स्टॉप ते माळनाका या भागात पाणी पुरवठा करण्यात येईल. जास्त टंचाई असलेल्या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी सहा टँकर तैनात करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांनी दिली आहे.