|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुंढर फार्महाऊसवर ‘रात्रीस खेळ चाले’!

मुंढर फार्महाऊसवर ‘रात्रीस खेळ चाले’! 

रात्रभर चालतो लाखो रूपयांचा जुगार बडय़ा हस्तीवर पोलिसांची मेहरनजर का?

वार्ताहर/ शृंगारतळी

 अवैध धंद्याविरोधात पत्रकारांनी पुकारलेल्या एल्गारानंतर जिल्ह्यातील बहुतांश धंद्यांविरोधात कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. सातत्याच्या पाठपुराव्यानंतर  शृंगारतळीतील अवैध व्यवसाय बंद झाल्याचे चित्र असतानाच तालुक्यातील मुंढर येथील एका फार्महाऊसवर मात्र ‘रात्रीस खेळ चाले’ सुरू आहे. या फार्महाऊसवर  खुलेआम रात्री जुगार अड्डा चालवला जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या सर्व प्रकारावर पोलिसांची मेहेरनजर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खेडमध्ये पत्रकारांना मटका व्यावसायिकाने केलेल्या मारहाणीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गंभीर दखल घेत जिल्ह्यातील अवैध धंदे व्यावसायिकांच्या मुसक्या आवळायला सुरूवात केली आहे. मात्र गुहागरमध्ये सध्या वेगळेच चित्र पहायला मिळत आहे. या अवैध धंद्यांवर ‘तरूण भारत’ने आवाज उठवल्यावर शृंगारतळी व परिसरातील जुगार अड्डे व क्लोज नसलेले दारू अड्डे पोलिसांनी बंद केले. मात्र एकदा जुगाराचे व्यसन जडले की ते सुटत नाही. त्याप्रमाणे या क्लबचालकांनी ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला आहे.

तालुक्यातील मुंढर गावातल्या एका बडय़ा उद्योजकाच्या फार्महाऊसवर व घरात जुगाराचा खेळ रात्री सुरू आहे. या जुगार अड्डय़ावर मोठी गर्दी होत असल्याने वेटींगलाही रहावे लागते. अशा अड्डय़ावर दिवसाला 10 लाखांहून अधिक उलाढाल होत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्राने नाव न घेण्याच्या अटीवर दिली आहे.

जुगार चालवणाऱया या हस्तीवर चार वर्षापूर्वी मोठी कारवाई झाली होती. त्यामध्ये अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. अशी ही हस्ती सध्या कारवाई करणाऱयांनाच मी ‘मॅनेज’ केल्याचे सांगत खुलेआम व्यवसाय करत असल्याचे समजते. यामुळेच या हस्तीवर पोलिसांची मेहेरनजर आहे का अशी चर्चा सुरू आहे.

 

Related posts: