|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » टेम्पो झाडावर आदळून चालक ठार

टेम्पो झाडावर आदळून चालक ठार 

महामार्गावर धामणी बसथांब्याजवळ अपघात

वार्ताहर/ संगमेश्वर

आयस्क्रिम वाहतूक करणारा भरधाव टेम्पो झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून  टेम्पोतील प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास धामणी यादववाडी बसथांब्याजवळ घडला.

माल वाहतूक करणारा टेम्पोचालक मेघ शिव सिंह (45, रा. उत्तरप्रदेश) हा अपघातात जागीच ठार झाला. तर टेम्पोमधून प्रवास करणारा  विक्रम आत्मज सिंग  जखमी झाला. मेघ सिंह टेम्पोमध्ये आयस्क्रीम घेवून मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करत होता. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी यादववाडी थांब्याजवळ सोमवारी सकाळी 7 च्या दरम्यान मेघ सिंह याचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्यामुळे  टेम्पो भरधाव वेगाने झाडावर जावून आदळला.

टेम्पो वेगाने झाडावर आदळल्याने चालकाजवळील बाजू आतमध्ये चेपली जावून चक्काचूर झाला. यामध्ये मेघ सिंग यांच्या पोटात स्टेअरिंग घुसल्याने तो गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून शेजारचे ग्रामस्थ, महामार्गावरील वाहनचालक यांनी मदतीसाठी धाव घेतली.  गंभीर जखमी झालेल्या विक्रम आत्मज सिंग याला बाहेर काढण्यात आले। रुग्णवाहिका चालक प्रसाद सप्रे यांनी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  या अपघाताची खबर विक्रम सिंग यांनीच संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.

धामणी यादववाडी बसथांबा नेहमीच गजबजलेला असतो. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी याच ठिकाणी थांबलेले असतात. परंतु शाळा, हायस्कूल, कॉलेज बंद असल्याने बसथांब्याजवळ कोणीही नव्हते. दोनच दिवसांपुर्वी संगमेश्वर बसस्थानकाजवळ खासगी आराम बस अशीच दुकानांमध्ये घुसली होती. या दोन्ही घटनांमध्ये वाहनांच्या वेगावर नियंत्रण नसणे हा समान मुद्दा आहे.