|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिवसेना शेतकऱयांच्या पाठीशी

शिवसेना शेतकऱयांच्या पाठीशी 

प्रतिनिधी/ म्हसवड

सरकारने जनावरांच्या छावण्या सुरु केल्या. मात्र, जनावरांसह छावणीला आपले घर म्हणून राहणाऱया माताभगिनी, शेतकरी व त्याच्या मुलांची अन्नधान्यामुळे उपासमार होऊ नये, यासाठी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील छावणीतील मुलांचे शिक्षण, त्याचे कुटुंब यांची उपासमार होऊ नये, यासाठी छावणीतील शेतकरी कुटुंबाला दोन महिने पुरेल एवढा धान्यसाठा सेनेमार्फत पुरवण्यात येऊन सेना शेतकऱयांच्या मागे खंबीर उभी आहे. तुम्हाला काहीही कमी पडू दिले जाणार नाही. त्याचप्रमाणे येत्या डिंसेबरपर्यंत दुष्काळी भागातील अपूर्ण उरमोडी जिहे कठापूर पाणी योजना पूर्ण करुन कायमस्वरुपी दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी माणदेशी छावणीवर बोलताना दिले.

येथील माणदेशी फाउंडेशनच्या चारा छावणीत शिवसेना पक्षाच्यावतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, कृष्णा खोरे  महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे – पाटील, रणजितसिंह देशमुख, चंद्रकांत जाधव, बाळासाहेब मुलाणी, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार बी एस माने, रासपाचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, सचिन भिसे, विजय सिन्हा अमित कुलकर्णी, शिवाजी केवटे, सोमनाथ कवी, आनंद बाबर, आदित्य सराटे उपस्थित होते.

यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचा झळा बसत आहेत. जिह्यात सर्वाधिक फटका माणला बसलाय. सरकारच्या माध्यमातून येथे चारा छावणी सुरु झाली. जनावरे वाचवण्यासाठी चारा छावण्या तीन ते पाच दिवसात सुरु कराव्यात अशा सुचना मागील दौऱयावेळी केल्या होत्या. त्यामुळे लोकांना अडचणीच्या काळात आधार झाला. चारा छावणीत जनावरे दुभती दिसून आली. छावणीतील रहिवासी लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे. छावणीतील जनावरे, त्यांच्या सोबत राहणारी माणसं त्याच्यांसाठी काही तरी केले पाहिजे. यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे.यांच्या आदेशानुसार लोकांची काळजी शिवसेनेने केली.लोकांना अडचण येऊ देणार नाही.संकटात शिवसेना प्रमुख पाठीशी आहेत. जिहे कठापूर योजना गुंजवणी
धरणाप्रमाणे पूर्ण करता येईल. डिसेंबर अखेर पाणी तालुक्यात येईल. टेंभू, उरमोडीचे पाणी शेतीच्या बांधापर्यंत शासनाच्या माध्यमातून डिसेंबर अखेर पोहोचवले जाणार आहे. येथील युवकांच्या हाताला काम देण्यासाठी नोकऱयांसाठी मोठे उद्योग आले पाहिजेत. लोकांना काम मिळाल्याशिवाय दुष्काळी भागात सुबत्ता येवू शकत नाही, विविध संस्थांच्या माध्यमातून दुष्काळी भागात अन्नधान्य उपलब्ध करुन देणार असून या भागात बाहेरचे पाणी आणि रोजगार
दिल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही देतो, असे शेवटी शिवतारे म्हणाले.

यावेळी बोलताना नितीन बानुगडे पाटील म्हणाले, येथील बळीराजाने पोटच्या मुलाप्रमाणे आपण आपल्या जनावरांना सांभाळतो. त्यांना जगवणे अडचणीच्या काळात सरकारची जबाबदारी आहे.राज्य शासन संवेदनशीलता दाखवत सर्वसामान्य शेतकऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे शासनाच्या कारभारावरुन दिसून येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी शिवसेना सदैव उभी असून चारा छावणीत पक्षाच्या माध्यमातून शिधा वाटप करतोय, शिवसेना कायमच शेतकऱयांच्या पाठीशी राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक विजय सिन्हा यांनी केले. यावेळी हजारो शेतकरी उपस्थित होते.