|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » व्यापाऱयाला लुटणाऱया टोळीचा पर्दाफाश

व्यापाऱयाला लुटणाऱया टोळीचा पर्दाफाश 

आजरा फाटय़ावरून केले होते अपहरण : पाचजण जेरबंद : पोलीस अधीक्षकांची माहिती

13 मे रोजी घडली होती घटना

हातकणंगलेतील व्यापाऱयाची लूट

त्यांच्याच पूर्वीच्या चालकाकडून कबुली

निपाणी, इचलकरंजी, गोव्यात धरपकड

आणखी एक संशयित आरोपी पसार

पसार संशयित गोवा पोलीस सेवेत कार्यरत

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

आंबोली-बेळगाव मार्गावर कोल्हापूर जिल्हय़ातील हातकणंगले येथील व्यापारी उमेश वसंतराव पिसे यांना लुटणाऱया टोळीतील पाच गुन्हेगारांना पकडण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली. कोल्हापूर, गोवा, बेळगाव आणि सावंतवाडी येथील हे संशयित आरोपी आहेत. त्यांच्याकडून स्कॉर्पिओ गाडी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सहावा संशयित आरोपी गोवा पोलीस कर्मचारी असून लवकरच त्यालाही जेरबंद करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

व्यापाऱयास लुटणाऱया टोळीस पकडण्यात आल्यानंतर त्याविषयी माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी आपल्या दालनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी कणकवली विभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे आदी उपस्थित होते.

13 मे रोजी घडली होती घटना

कोल्हापूर जिल्हय़ातील हातकणंगले येथील व्यापारी उमेश वसंतराव पिसे हे 13 मे 2019 रोजी गोवा येथून आंबोलीमार्गे कोल्हापूरकडे इर्टिगा कारने जात  असताना पाच-सहाजणांनी त्यांचा स्कॉर्पिओ गाडीने पाठलाग करून आंबोली आजरा फाटा येथे त्यांना अडवले व त्यांचे अपहरण करून दांडय़ाने मारहाण करीत पिस्तुल दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम एक लाख 90 हजार रुपये असा एकूण 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला. तसेच उमेश पिसे यांना बेळगावला टाकून ते पळून गेले होते.

उमेश पिसे यांच्या पूर्वीच्या चालकाने दिली कबुली

या दरोडय़ाबाबत उमेश पिसे यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दिली होती. या घटनेने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या तक्रारीनुसार दरोडय़ाच्या तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेमार्फत सुरू करण्यात आला. सुरुवातीस गुन्हय़ामध्ये वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओचा शोध बेळगाव, कोल्हापूरमध्ये घेण्यात आला. ‘ओलेक्स’वरही स्कॉर्पिओ विक्रीसाठी असल्याच्या संशयावरून तपास करण्यात आला. तसेच व्यापारी उमेश पिसे यांचा पूर्वीचा चालक म्हणून नोकरीस असलेला तरुण या गुन्हय़ात असल्याचा संशय व्यक्त झाला. त्याप्रमाणे त्या चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हय़ाची कबुली दिली. त्यानंतर दरोडा टोळीतील एकूण सहा संशयित आरोपींपैकी एकूण पाच संशयित आरोपींना निपाणी, इचलकरंजी आणि गोवा येथून पकडण्यात आले. मंगळवारी पहाटे सहा वाजता सर्वांना जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडून स्कॉर्पिओ गाडी व 10 हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली. उर्वरित रोख रक्कम, दागिनेही लवकरच जप्त केले जाणार आहेत. सहावा संशयित आरोपी गोवा पोलिसांत असून त्यालाही लवकरच जेरबंद केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

 जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक निमित गोयल, सहायक पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, कृष्णा केसरकर, संकेत खाडये, रवी इंगळे, स्वप्निल तोरस्कर या पोलीस पथकाने दरोडय़ाच्या टोळीतील संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळवले.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये स्वप्नील बाळासो गजबर (32, रा. इचलकरंजी), सुरज नजीर मेहतर (33, रा. म्हापसा, गोवा), उत्तम विष्णू कामटे (31, रा. निपाणी), संगमेश बंडू जाधव (30, निपाणी), विजय विलास भोई (21, मुरगूड, ता. कागल) यांचा समावेश आहे. या सर्वांना मंगळवारी सायंकाळी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना 17 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

न्यायालयात सरकार पक्षातर्फे जिल्हा न्यायालयाचे प्रभारी सहायक संचालक ऍड. एस. एस. गुजार यांनी बाजू मांडताना, सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून संशयितांनी लुबाडलेला ऐवज जप्त करणे व अन्य फरार साथिदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केली. तसेच गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी संशयितांचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली.