|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अपेक्षांच्या अट्टहासात वाढणारे वय!

अपेक्षांच्या अट्टहासात वाढणारे वय! 

‘मॅडम, काय करावं ते सुचत नाहीये हो. आम्ही अगदी कंटाळलो आहोत सगळय़ाला. नकोच वाटतंय सारं…’ ‘हं… नेमकं काय झालं आहे?’

‘आमचा मुलगा विरेन, उच्चपदस्थ आहे, घर, नोकरी सारं सेटल आहे परंतु पस्तीशी ओलांडून गेली तरी लग्न झालं नाही. सुरुवातीला थोडं सेटल होऊ दे म्हणून लग्नाला तयार नव्हता नंतर स्थळे पहायला सुरुवात केली. त्याला अनुरूप मुलगी मिळेना. थोडीही ऍडजेस्टमेंट करायला तयार
नाही.

या संदर्भात आम्ही काही बोलायला गेलो तरी ऐकत नाही. आता लग्न तर करायचंय, पण ठरत नाही म्हणून चिडचिड. पस्तीशी ओलांडली तरी लग्न का ठरत नाही, नेमका काय प्रॉब्लेम, असे नातेवाईकांचे असंख्य प्रश्न, बोलणी, याचा त्रागा करणं यामध्ये आमची फार कसरत होते हो. याचं लग्न ठरणार केव्हा, मनपसंत जोडीदार मिळणार केव्हा आणि संसार व्हायचा केव्हा, हे सारेच प्रश्न आहेत.’ विरेनची आई अगदी थकलेल्या स्वरात बोलत होती. विरेनसारखी अनेक उदाहरणे सातत्याने समोर येतात.

शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या विवाह संस्थेचे बदलते रूप, बदलत्या संकल्पना, नात्यांचे बदलते प्रवाह, उद्भवणाऱया अनेक समस्या हे सारं आपण पाहतो आहोतच. उपवर वधू-वरांचे वाढणारे वय आणि त्या अनुषंगाने उद्भवणारे अनेक प्रश्न हे सारं सातत्याने समोर येत असतं. योग्य वेळेत विवाह न होणं ही एक समस्या बनत चालली आहे. काही काळापूर्वी साधारणतः वयाच्या 23 व्या वर्षापर्यंत मुलीचे वय आणि अठ्ठावीसपर्यंत मुलाचे वय अशा वयोगटाच्या टप्प्यात विवाह व्हायचे आणि सहजीवनाचा बराचसा प्रवास सुरळीत व्हायचा. सुरळीत या अर्थाने की, विवाहानंतर त्या जोडप्याची मुले, त्यांचे शिक्षण आणि ती करती सवरती झाल्यावर त्या जोडप्याची नोकरीतील निवृत्ती असा सुटसुटीत आलेख असायचा. परंतु अलीकडच्या काळात मुला-मुलींचे उच्च शिक्षण, सेटल होऊन मनपसंत जोडीदार मिळेपर्यंत वाढत जाणारे वय, एका विशिष्ट वयानंतर ठाम होत जाणारी मते, आतापर्यंत थांबलो मग आताच कशाला ‘ऍडजेस्टमेंट’ करायची असा अट्टहास अशा अनेक गोष्टींमुळे विवाहेच्छुक मुला-मुलींचे वाढते वय ही पालकांसाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.

बदलती जीवनशैली, मुलांचे शिक्षण-उच्चशिक्षण, चांगल्या पगाराची नोकरी वा व्यवसायात जम बसेपर्यंत मुलांची तिशी ओलांडून गेलेली असते. मुलीचेही उच्चशिक्षण होऊन जोडीदार निवडीच्या संदर्भातील विचाराला वयाच्या सत्ताविसाव्या वषी सुरुवात होते. लव्ह मॅरेज असेल तर सेटल झाल्या झाल्या लग्न केलेही जाते. परंतु ऍरेंज मॅरेज करताना स्वजातीय, शाखा-पोटशाखा हा भेद मनामध्ये पक्का असतो. त्याचबरोबर वधू-वरांची जन्मकुंडली (पत्रिका) जुळण्याचा अट्टहास असतो. त्याला ‘ती’ किंवा तिला ‘तो’ ‘क्लिक’ झाला/झाली नाही म्हणूनही अनेकदा स्थळं नाकारली जातात. या साऱया गोष्टीमधून वाटचाल करत करत स्वप्नातला राजकुमार वा राजकुमारी मिळेपर्यंत पस्तीशी ओलांडून जाते. काही वेळा विवाहानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचा अर्थ उशिरा विवाह झाला म्हणून तो यशस्वी होतच नाही असा नाही परंतु लग्नाला विलंब झाल्याने उद्भवणारे प्रश्न किंवा काही समस्या येऊ शकतात याची पुरेशी जाणीव नसेल, जोडीदारामध्ये समंजसपणा नसेल तर मग त्यातूनही अनेक ताणतणाव निर्माण होऊ शकतात. विशेषतः स्त्रियांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पस्तीशीनंतर गरोदरपण, प्रसूती या गोष्टी सहज सोप्या असतीलच असे नाही. सुदैवाने सारे सुरळीत झाले तरी मुलं, त्यांचे शिक्षण, उच्चशिक्षण होईपर्यंत त्या दाम्पत्यांना तारेवरची कसरत करावी लागते.

मुळातच असे काही प्रश्न, समस्या, विवाहाला जास्त विलंब झाल्यास उद्भूव शकतात याची जाणीव आणि त्यादृष्टीने विचार या गोष्टी विवाहेच्छुक मुला-मुलींना समजावून सांगणे आवश्यक आहे. मुलगा वा मुलगी तो/ती मला क्लिक झाली नाही हा शब्दप्रयोग सर्रास करतात. हे क्लिक होणं म्हणजे नेमकं काय? आपल्याला जोडीदार कसा हवा, आपण कसे आहोत? आपल्या अपेक्षा काल्पनिक नाहीत ना? तडजोडीसाठी आपण किती तयार आहोत याचा प्रामाणिक विचार, चिंतन, उपवर वधू-वरांपेक्षा त्यांच्या जोडीदाराबाबत पालकांच्याच अपेक्षा जास्त असेही चित्र पहायला मिळते. अर्थात तोही एखाद्या स्वतंत्र लेखाचा विषयच होईल. परंतु विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी जोडीदार निवडीबाबत विचार करताना काही मुद्दे, त्या अनुषंगाने विचार केला तर बऱयाच गोष्टी सोप्या होतील.

आपली बलस्थाने (strength) उणीवा/दोष (weaknesses) प्राप्त परिस्थितीमध्ये उपलब्ध संधी (opportunities) आणि संभाक्य धोके (threats) याचा प्रामाणिक आलेख जर काढला गेला तर अनेक गोष्टी उलगडतील.

मुळातच मी नेमका कसा/कशी आह,s खऱया अर्थाने सहजीवनाच्या वाटचालीसाठी तयार आहे का? परिपूर्ण वा बिनचूक जोडीदारच हवा अशी स्वप्ने रंगवत असताना मी स्वतः खरंच परिपूर्ण आहे का? माझ्यामध्ये काहीच उणीवा नाहीत का, हे प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे.

चित्रपट, नाटके, मालिका यामध्ये दाखविण्यात येणारे संसार, काल्पनिक जग, आणि वास्तव याची जाणीव तरुण-तरुणींना करून देणे गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. प्रत्येकामध्ये काही ना काही वैशिष्टय़े, गुण जसे असतात तशा उणीवाही असतातच.

जोडीदाराविषयी अपेक्षा असणे गैर नाही परंतु स्थळ, काळ, परिस्थिती, वाढणारं वय याचं भान असणं आवश्यक आहे. ‘आपण कुणाचं तरी असणं आणि कुणीतरी आपलं असणं’ ही भावनात्मक मूलभूत गरज ओळखून त्यादृष्टीने विचार होणं आवश्यक आहे. इतर गोष्टींसोबतच भक्कम भावनात्मक आधार हे सहजीवनाचं खरं सूत्र आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये.

वैवाहिक नातं हे खूप वेगळं आहे. प्रामाणिक आत्मपरीक्षण करत जोडीदार निवडीबाबत अपेक्षा ठेवल्या तर विवाह ठरताना कठीण वाटणाऱया बऱयाच गोष्टी सहज, सोप्या होतील आणि सहजीवनाचा प्रवास खऱया अर्थाने समाधान देणारा ठरेल!

Ad. सुमेधा देसाई&, मो.94226 11583