|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या प्रेमी युगुलाला पोलिसांनी वाचविले

लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या प्रेमी युगुलाला पोलिसांनी वाचविले 

वार्ताहर / मालवण:

  रॉक गार्डननजीकच्या खडकाळ भागात समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या एका प्रेमी युगुलास पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता वाचविल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल नसती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.

  सोमवारी सायंकाळी बांदा येथील एक प्रेमी युगुल रॉक गार्डन परिसरातील खडकाळ परिसरात बसले होते. त्याचवेळी अचानक लाटांचा जोर वाढल्याने खडकाळ भागात लाटांचा तडाखा बसू लागला. या लाटांच्या तडाख्यात दोन पर्यटक अडकल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, सिद्धेश चिपकर, प्रतिभा जाधव, प्रविणा आचरेकर यांनी रॉक गार्डनच्या खडकाळ भागात धाव घेतली. त्यावेळी त्यांना युवक व युवती लाटांनी वेढलेल्या स्थितीत अडकून पडल्याचे दिसून आले. यावेळी पोलीस कर्मचारी सिद्धेश चिपकर यांनी युवक व युवतीला धीर दिला. त्यानंतर युवक लाटांचा सामना करीत सुरक्षित ठिकाणी आला. मात्र युवती लाटांनी वेढली गेली. यावेळी सिद्धेश चिपकर यांनी त्या युवतीला मार्गदर्शन करीत लाटांच्या विळख्यातून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. प्रेमी युगुलाला जीवदान देणाऱया सिद्धेश चिपकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.